राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ चे यजमानपद बर्मिंगहॅमला मिळाल्यास त्यामध्ये पुरुषांच्या क्रिकेटचा समावेश होऊ शकतो. डरबनमध्ये आर्थिक आणि राजकीय वाद सुरु असल्याने यजमानपदाच्या शर्यतीतून आपले नाव मागे घेतले आहे. यानंतर राष्ट्रकुल स्पर्धेच्या यजमानपदासाठी ब्रिटन सरकारकडून बर्मिंगहॅमचे नाव सुचवण्यात आले आहे.

डरबनमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल खेळांमध्ये महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. वर्कशेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी नील स्नोबॉल यांनी बर्मिंगहॅममधील स्पर्धेत आयसीसी आणि ईसीबीच्या मदतीने क्रिकेटचा समावेश करण्याचा मानस व्यक्त केला आहे. या क्रिकेटचे स्वरुप टी-२० असेल. क्रिकेटचे सामने एजबेस्टन आणि वर्सेस्टशायरच्या न्यू रोड होममध्ये होणार आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेच्या यजमानपदाच्या शर्यतीत बर्मिंगहॅमसोबतच कॅनडा, मलेशिया आणि ऑस्ट्रेलियामधील शहरांचादेखील समावेश आहे. यासोबतच लिव्हरपूलही यजमानपदासाठी उत्सुक आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेसाठी ब्रिटन सरकारकडे अर्ज पाठवण्याची अंतिम मुदत २८ एप्रिल आहे. यावरील अंतिम निर्णय जुलैमध्ये घेण्यात येईल. ईसीबीने याआधीही राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यासाठी समर्थन दिले आहे. मात्र यासाठी अद्याप आयसीसीने पाठिंबा दिलेला नाही. मलेशियामध्ये १९९८ मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत इंग्लंडने आपला संघ पाठवला नव्हता. यावेळी पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. यानंतर पुन्हा राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला नव्हता. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत अंतिम सामना जिंकला होता.

राष्ट्रकुल स्पर्धेत आवश्यक असणाऱ्या खेळांच्या यादीत क्रिकेटचा समावेश होत नाही. क्रिकेटचा समावेश पर्यायी खेळांच्या यादीत होतो. राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमानपद स्वीकारणारे देश क्रिकेटचा समावेश करायचा की नाही, याचा निर्णय घेऊ शकतात.