बॉक्सिंग इंडियाचे अध्यक्ष संदीप जजोडिया व सरचिटणीस जय कवळी यांना अविश्वासाच्या ठरावाला सामोरे जावे लागणार आहे. रविवारी नवी दिल्लीत होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये या ठरावावर मतदान होणार आहे.
जजोडिया यांनी गतवर्षी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनच्या (एआयबीए) निरीक्षणाखाली झालेल्या निवडणुकीत बॉक्सिंग इंडियाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांच्याबरोबरच कवळी यांच्या कारभाराबाबतही कार्यकारिणीतील अन्य सदस्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. या दोन्ही पदाधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. संघटनेशी संलग्न असलेल्या ३१ सदस्यांपैकी बहुतांश सदस्यांचा या ठरावाला पाठिंबा मिळणार असल्यामुळे या दोन्ही पदाधिकाऱ्यांना पायउतार व्हावे लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत.
जजोडिया व कवळी यांच्यात गेले अनेक दिवस मतभेद निर्माण झाले आहेत. कवळी यांनी जजोडिया यांची खोटी सही करीत आशियाई बॉक्सिंग महासंघास पत्र पाठविले असल्याचा आरोप कवळी यांच्यावर करण्यात आला आहे. संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, ‘‘रविवारी होणारा ठराव निश्चितपणे मंजूर होईल, कारण बहुतांश पदाधिकारी जजोदिया व कवळी यांच्याविरोधात उभे ठाकले आहेत. हे दोघेही एकमेकांना सतत पाण्यात पाहत असल्यामुळे संघटनेची प्रगती ठप्प झाली आहे. त्यांनी राजीनामा देणे उचित ठरेल.’’ तथापि, जजोदिया यांच्या पाठीराख्याने सांगितले की, ‘‘आम्ही हार मानत नाही. आम्ही ठरावास सामोरे जाणार आहोत. जजोडिया हे स्वत:हून पदाचा राजीनामा देणार नाहीत. जर हा ठराव मंजूर झाला तर लगेचच पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल व त्यामध्ये नवीन पदाधिकाऱ्यांची निवड केली जाईल. अर्थात आयबीएफच्या निरीक्षकांच्या उपस्थितीत व त्यांचे नियमानुसारच ही निवड होणार आहे असे सांगून संघटनेचा पदाधिकारी म्हणाला की, आम्ही भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचा पाठिंबा मिळवू. ती आमची पालक संघटना असल्यामुळे त्यांच्याबरोबर आम्हाला राहावेच लागेल.’’
दरम्यान, जजोडिया यांनी आंतरराष्ट्रीय संघटनेला पत्र पाठवून रविवारी होणाऱ्या बैठकीची माहिती दिली असल्याचे समजते. बॉक्सिंग इंडियाचे माजी अध्यक्ष अभयसिंह चौताला हे आयओएच्या मदतीने बॉक्सिंग इंडियावर पुन्हा आपली सत्ता आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे जजोडिया यांनी आंतरराष्ट्रीय महासंघास कळविले आहे. आगामी ऑलिम्पिककरिता चार महिन्यांनी पात्रता स्पर्धा होत असल्यामुळेच जजोडिया यांनी हे पत्र पाठविले असल्याचेही समजते.
चौताला हे सप्टेंबर २०१२ पर्यंत भारतीय हौशी बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष होते, मात्र त्यांनी निवडणुकीत घोटाळे केल्याचा आरोप ठेवत एआयबीएने २०१३ मध्ये ही संघटनाच बरखास्त केली होती. गतवर्षी एआयबीएच्या मार्गदर्शनाखाली बॉक्सिंग इंडियाच्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या.