रिअल माद्रिद म्हटलं की ख्रिस्तियानो रोनाल्डोचे नाव समोर येते. जगातल्या मातब्बर क्लब्सपैकी एक आणि रोनाल्डो या क्लबचा चेहरा. मात्र बदलत्या आर्थिक समीकरणांच्या पाश्र्वभूमीवर या नात्यात दुरावा निर्माण होण्याची चिन्हे आहेत. रिअल माद्रिदच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेला खेळाडू म्हणजे अँजेल डि मारिया. मारिया आणि रोनाल्डो एकमेकांचे जिवलग मित्र. मारियाने दिलेल्या माहितीनुसार रोनाल्डो रिअल माद्रिद व्यवस्थापनावर नाखुश असून, लवकरच क्लब सोडण्याची शक्यता आहे.
जगातल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत रोनाल्डोचे नाव अव्वल तीनमध्ये आहे. मात्र या हंगामातील बदलत्या आर्थिक समीकरणांमुळे डी मारिया आणि राडामेल फालाको हे दोघेही कमाईच्या बाबतीत रोनाल्डोला मागे टाकून पुढे गेले आहेत. मँचेस्टर युनायटेडने वेन रुनीशी ३००, ००० युरो रकमेचा करार केल्याचे वृत्त आहे. हे सगळे पाहता रोनाल्डोलाही आर्थिक बढती मिळावी अशी अपेक्षा होती. मात्र तसे कोणतेही संकेत रिअल माद्रिद व्यवस्थापनाने न दिल्याने तो व्यथित झाला आहे. याचाच परिणाम म्हणून ग्रॅनडाविरुद्ध गोल केल्यानंतरही त्याने जराही आनंद व्यक्त केला नाही. मी खुश नाही, म्हणूनच गोलचा आनंद व्यक्त केलेला नाही. मी का आनंदी नाही हे रिअल माद्रिद क्लबला माहित आहे अशा शब्दांत रोनाल्डोने आपली निराशा व्यक्त केली. रोनाल्डोने रिअल माद्रिद सोडल्यास तो पुन्हा मँचेस्टर युनायटेड संघात परतेल अशा चर्चाही रंगू लागल्या आहेत.