मेस्सी व रोनाल्डोच्या खेळाकडे लक्ष

रिअल माद्रिद आणि बार्सिलोना या दोन बलाढय़ क्लबमधील लढत ‘एल क्लासिको’ या स्पॅनिश नावाने प्रसिद्ध आहे. उत्कृष्ट, अव्वल दर्जाचा, अतिप्रसिद्ध असा या वाक्याचा अर्थ.. हा अर्थ केवळ या दोन क्लबमधील पारंपरिक द्वंद्वामुळे नाही, तर या क्लबमधील रंगणाऱ्या चुरशीमुळे, वर्षांनुवष्रे मिळत आलेल्या प्रसिद्धीमुळे प्राप्त झाला आहे. ला लिगाच्या यंदाच्या मोसमातील पहिली ‘एल क्लसिको’ लढत शनिवारी बार्सिलोना येथील कॅम्प नाउ स्टेडियमवर होणार आहे. या लढती गेल्या मोसमातील घरच्या मैदानावर झालेल्या पराभवाचे उट्टे काढण्याबरोबर रिअल माद्रिदचा विजयरथ रोखण्याचे दुहेरी आव्हान बार्सिलोनाला पेलावे लागणार आहे.

झिनेदीन झिदान यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या माद्रिदने १३ सामन्यांत ३३ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे आणि गत एप्रिलपासून सर्व स्पर्धामध्ये एकूण ३१ सामन्यांत अपराजित राहण्याचा विक्रमही केला आहे. ला लिगा स्पध्रेची सर्वाधिक ३२ जेतेपदे माद्रिदच्या नावावर आहेत, तर गतविजेत्या बार्सिलोनाने २४वेळा हा मान पटकावला आहे. दोन्ही क्लब्सना दुखापतीने घेरले आहे. माद्रिदला प्रमुख आक्रमणपटू गॅरेथ बेलशिवाय खेळावे लागणार आहे. घोटय़ाच्या शस्त्रक्रियेमुळे बेलला चार महिन्यांची विश्रांती घ्यावी लागणार आहे, तर टोनी क्रुसही पायाच्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर आहे. बार्सिलोनाच्या जॉर्डी अल्बा आणि पिक्यू यांच्या तंदुरुस्तीबाबत साशंकता आहे.

यंदाच्या मोसमात बार्सिलोनाची सुरुवात निराशाजनक झाली असली तरी माद्रिदविरुद्ध विजयाचा दावा ते करत आहेत. ‘शनिवारी माद्रिदपेक्षा अधिक घोटीव खेळ आम्ही करणार आहोत. त्यामुळे त्यांचा पराभव होऊ शकतो, आमचा नाही,’ असे मत बार्सिलोनाचा बचावपटू जेरार्ड पिक्यूने व्यक्त केले. प्रशिक्षक लुईस एन्रिक म्हणाले की,‘जेतेपदाचे आम्हीच प्रबळ दावेदार आहोत, परंतु आम्हाला त्यासाठी सुधारणा करायला हवी. खेळात सातत्याचा अभाव निश्चित आहे, परंतु त्याची अतिशयोक्ती करू नका.’

या लढतीसाठी झिनेदीन झिदान याने कोपा डे रे स्पध्रेत माद्रिदच्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली होती. मात्र, माद्रिदच्या दुसऱ्या फळीनेही आपली उपयुक्तता सिद्ध करत विजय मिळवला.

  • ०३ माद्रिदविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या सर्व स्पर्धामधील मागील १३ सामन्यांतील तीन लढतीत बार्सिलोनाला पराभव पत्करावा लागला आहे. बार्सिलोनाने ७ सामने जिंकले असून ३ लढती अनिर्णित राखल्या.
  • ०५ रिअल माद्रिदने सर्व स्पर्धामधील बार्सिलोनाविरुद्ध मागिल ९ सामन्यांपैकी पाचमध्ये विजय मिळवला आहे. त्यामध्ये गत मोसमात कॅम्प नाऊ येथे झालेल्या २-१ अशा विजयाचा समावेश आहे.
  • ५० बार्सिलोनाने शनिवारचा सामना जिंकल्यास ला लिगा स्पध्रेतील घरच्या मैदानावर रिअल माद्रिदविरुद्धचा हा त्यांचा ५०वा विजय असेल.
  • १७३ रिअर माद्रिद आणि बार्सिलोना यांच्यातील हा १७३वा सामना असून माद्रिदने ७२ विजय मिळवले आहेत, तर बार्सिलोनाच्या खात्यात ६८ विजय आहेत. ३२ लढती अनिर्णित राहिल्या.

सामन्याची वेळ : रात्री ८.४५ वाजल्यापासून

थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी सिक्स एचडी, सोनी इएसपीएन