आर्सेनल क्लबमधील बहुतेक खेळाडूंना फुटबॉल सामने जिंकण्यापेक्षा ‘सेल्फी’ काढण्यात आणि ‘सिक्सपॅक’ बनविण्यात स्वारस्य आहे आणि त्यामुळे यंदाच्या इंग्लिश प्रीमिअर लीगचे (ईपीएल) जेतेपद पटकावण्यासाठी ते सक्षम नाहीत, अशा शब्दांत मँचेस्टर युनायटेडचा माजी कर्णधार रॉय केन यांनी आर्सेनलच्या खेळाडूंवर सडकून टीका केली.
आक्रमक मध्यरक्षक म्हणून ओळख असलेल्या केन यांनी खेळाडू म्हणून सात प्रीमिअर लीगचे जेतेपदे पटकावली आहेत आणि आर्सेनल क्लबसोबत त्यांनी नेहमी स्पर्धात्मक खेळ केला आहे. सध्या केन आर्यलड संघाच्या साहाय्यक प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहेत. २००३-०४ च्या सत्रानंतर आर्सेनल क्लबला ईपीएलचे जेतेपद पटकावण्यात अपयश आले आहे. २००४ च्या संघाप्रमाणेच
केन यांना सध्याचा संघ समतोल वाटतो.
याबाबत केन म्हणाले की, ‘‘आर्सेनल क्लबमध्ये काही चांगले खेळाडूही आहेत, परंतु संघातील एक-दोन खेळाडूंना सेल्फी काढण्यात आणि सिक्सपॅक बनविण्यात स्वारस्य आहे. त्यांना आठवडय़ाच्या प्रत्येक दिवशी छायाचित्र काढायला आवडते. प्रत्येक वर्षी आर्सेनल जेतेपदाचा दावेदार असल्याचे आपण ऐकतो. मात्र, प्रीमिअर लीगवर लक्ष्य केंद्रित करण्याऐवजी खेळाडू शरीरयष्टी, केशरचना यामध्येच रमलेले पाहायला मिळतात.’’