क्रोएशियाविरुद्ध उपउपांत्यपूर्व फेरीची लढत

साखळी गटात चाचपडत खेळणाऱ्या आणि गणितीय समीकरणांच्या बळावर बाद फेरी गाठणाऱ्या पोर्तुगालसमोर आता क्रोएशियाचे आव्हान आहे. क्रोएशियाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली असली तरी या सामन्यात त्यांच्यापुढे सर्वात मोठे आव्हान असेल ते ख्रिस्तियानो रोनाल्डोचे.

संघ म्हणून एकत्रित कामगिरी करता न आल्याने पोर्तुगालला साखळी गटात एकही विजय मिळवता आला नाही. आइसलँडविरुद्ध त्यांना १-१ बरोबरीत समाधान मानावे लागले. या लढतीनंतर पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने आइसलँडच्या खेळाडूंच्या मनोवृत्तीवर टीका केली होती. या लढतीत झालेल्या चुका पोर्तुगालला ऑस्ट्रियाविरुद्ध सुधारता आल्या नाहीत. ऑस्ट्रियाविरुद्ध गोलशून्य बरोबरी झाल्याने पोर्तुगालच्या बाद फेरीच्या प्रवेशाबाबत साशंकता निर्माण झाली. हंगेरीविरुद्धच्या करो या मरो लढतीत  पोर्तुगालने रोनाल्डोच्या आक्रमक खेळाच्या बळावर ३-३ बरोबरी साधली. एकही लढत न जिंकताही गणितीय समीकरणांच्या बळावर पोर्तुगालने बाद फेरी गाठली. रोनाल्डोने अन्य खेळाडूंपेक्षा आपला दर्जा अव्वल असल्याचे सिद्ध केले आहे. मात्र संघ म्हणून ते अपयशी ठरले आहेत.

हंगेरीविरुद्धच्या दोन गोलसह युरो स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत रोनाल्डोने दुसऱ्या स्थानी झेप घेतली. मायकेल प्लॅटिनी यांचा ९ गोलचा विक्रम रोनाल्डोच्या दृष्टिक्षेपात आहे. क्रोएशियाविरुद्ध रोनाल्डोच पोर्तुगालसाठी हुकमी एक्का आहे.

‘क्रोएशिया तुल्यबळ संघ आहे. साखळी गटात त्यांनी स्पेनला चीतपट केले आहे. त्यांच्या क्षमतेचा आम्ही आदर करतो. परंतु आम्हाला त्यांचे कच्चे दुवे ठाऊक आहेत,’ असे रोनाल्डोने सांगितले.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण स्पर्धामध्ये क्रोएशियाच्या संघाला चांगली कामगिरी करता येत नाही अशी टीका फुटबॉल तज्ज्ञांनी केली होती. याव्यतिरिक्त संघाच्या आक्रमक पाठीराख्यांनी चेक प्रजासत्ताकविरुद्ध मैदानावर ज्वालाग्राही पदार्थ फेकत सामना रोखण्याचा प्रयत्न केला होता. अशा प्रतिकूल परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर क्रोएशियाने जिद्दीने चांगला खेळ करत बाद फेरी गाठली. या प्रक्रियेत त्यांनी बलाढय़ स्पेनला नमवण्याची किमया केली. चेक प्रजासत्ताकविरुद्ध त्यांनी २-२ बरोबरी केली आणि टर्कीवर १-० अशी मात केली. तुल्यबळ प्रतिस्पध्र्याचा गट असूनही क्रोएशियाने एकही लढत गमावली नाही. साखळी गटातल्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी क्रोएशियाचा संघ आतूर आहे. ल्युका मॉड्रिक परतल्याने क्रोएशियाचा संघ बळकट झाला आहे. मारिओ मंडझुकिकही पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

१९९८ विश्वचषकात क्रोएशियाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. इव्हान पेरिसिकने स्पेनविरुद्ध निर्णायक भूमिका बजावली होती. त्याच्याकडून दमदार खेळाची क्रोएशियाला अपेक्षा आहे. चेक प्रजासत्ताकच्या लढतीत खेळ स्थगित केल्याप्रकरणी क्रोएशियाच्या महासंघावर दंडाची कारवाई झाली आहे. पोर्तुगालविरुद्धच्या लढतीत चाहत्यांनी गोंधळ न घालता आम्हाला साथ द्यावी, असे आवाहन क्रोएशियाच्या खेळाडूंनी केले आहे.

 

वेळ

रात्री १२.३० वाजता

थेट प्रक्षेपण

सोनी ईएसपीएन, सोनी सिक्स.