क्रिकेटमधील माझा आदर्श असलेल्या सचिन तेंडुलकरच्या चरित्रपटाबद्दल मलाही उत्सुकता निर्माण झाली आहे, असे भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने सांगितले.
सचिनप्रमाणेच मोहम्मद अझरुद्दीन व महेंद्रसिंग धोनी यांच्याही चरित्रपटाचे लवकरच प्रकाशन होणार आहे. त्यापैकी कोणाचा चरित्रपट तुला आवडेल, असे विचारले असता कोहली म्हणाला, ‘‘मी नेहमीच सचिनला आदर्श मानले आहे. साहजिकच मला त्याचे आत्मचरित्र वाचण्याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. अर्थात अन्य दोन्ही खेळाडूंची आत्मचरित्रे वाचायला मला आवडेल.’’
कोहली याच्या चाहत्यांसाठी सिंगापूरच्या एका संस्थेने ‘विराट फॅनबॉक्स’ सुरू केला आहे. त्याचे उद्घाटन त्याच्या हस्ते करण्यात आले. कोहलीने वैयक्तिक जीवनाविषयी मत व्यक्त करण्यास नकार दिला. आगामी ऑलिम्पिकसाठी भारतीय संघाचे सदिच्छादूत म्हणून सिनेअभिनेता सलमान खानची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या विषयी विचारले असता कोहली म्हणाला की, ‘‘त्याबाबत मी मत व्यक्त करणे अयोग्य आहे. मत व्यक्त करण्याचे हे व्यासपीठ नाही.’’