भारत, ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका या तीन देशांच्या ‘अ’ संघांमधील एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेला बुधवारी सुरुवात होत आहे. ही स्पर्धा भारताच्या युवा खेळाडूंसाठी सुवर्णसंधी असून संघाचे नेतृत्व उन्मुक्त चंदकडे सोपवण्यात आले आहे.
स्पर्धेतील सलामीच्या लढतीत आफ्रिका ‘अ’ व ऑस्ट्रेलिया ‘अ’ हे दोन संघ झुंजणार आहेत. भारत ‘अ’ संघाचा शुक्रवारी पहिला सामना होणार आहे. ही स्पर्धा दिल्लीचा फलंदाज चंदसाठी कसोटीच ठरणार आहे. भारताच्या १९ वर्षांखालील संघात सातत्याने चमक दाखविणारा हा खेळाडू भारताच्या वरिष्ठ संघात अपेक्षेइतकी कामगिरी करू शकलेला नाही. उन्मुक्तने भारत ‘अ’ संघाकडून यापूर्वी ५५ सामन्यांमध्ये सरासरी ६८ धावांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. मात्र भारताच्या वरिष्ठ संघाकडून खेळताना त्याला सरासरी ३५ धावांपेक्षा जास्त धावा करता आलेल्या नाहीत. संघास एक हाती विजय मिळवून देण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. त्यामुळे तो येथे कशी कामगिरी करतो याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
भारतीय संघ आगामी दोन वर्षांमध्ये भरपूर सामने खेळणार असल्यामुळे उनमुक्त याच्याबरोबरच मनीष पांडे, केदार जाधव यांच्या कामगिरीबाबतही उत्कंठा निर्माण झाली आहे. केदारने झिम्बाब्बेविरुद्धच्या मालिकेतील एक दिवसीय सामन्यात शतक टोलविले होते.
गोलंदाजीत भारताची मदार प्रामुख्याने संदीप शर्मा, रुश कलारिया, ऋषी धवन, धवल कुलकर्णी या मध्यमगती गोलंदाजांवर आहे. हे सर्व गोलंदाज ताशी १३५ किलोमीटरपेक्षा कमी वेगानेच गोलंदाजी करतात. त्यामुळे अपेक्षेइतकी भेदक गोलंदाजी करणारा एकही गोलंदाज या संघात नाही हीच या संघापुढील समस्या आहे. येथील खेळपट्टीवर चेंडू थोडासा संथपणे येत असल्यामुळे सामन्यात कशी व्यूहरचना करायची हे कर्णधारांसाठी आव्हानच आहे. अशा खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाचे पारडे जड राहण्याची शक्यता आहे. त्यांनी भारताविरुद्धच्या अनधिकृत कसोटीत वर्चस्व गाजविले होते.
भारत अ संघ- उन्मुक्त चंद (कर्णधार), मयांक अगरवाल, मनीष पांडे, करुण नायर, केदार जाधव, संजू सॅमसन, अक्षर पटेल, परवेझ रसूल, करण शर्मा, धवल कुलकर्णी, संदीप शर्मा, रुश कलारिया, मनदीप सिंग, गुरकीरत सिंग मान, रिशी धवन
ऑस्ट्रेलिया अ संघ- डीन एल्गर (कर्णधार), थेयुनिस डी ब्रुन, रीझा हेन्ड्रिक्स, वेन पारनेल, ब्युऑन हेन्ड्रिक्स, लोनवाबो त्सोसोबे, इडी लेई, थोकोसोझी शेझी, खयान झोंडो, कॅमेरुन डेलपोर्ट, ओमफीले रमेला, डेन व्हिलास, हार्डुस व्हिलजोन, कोडी चेट्टी, केशव महाराज, क्विंटन डि कॉक.