नेमबाजी
बॅरी बुडॉन शूटिंग रेंजवर आतापर्यंत भारतीय नेमबाजांचे वर्चस्व राहिले होते. जितू राय आणि गुरपाल सिंग यांनी सोमवारी त्यावर शिक्कामोर्तब केले. ‘पिस्तूलकिंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जितू रायने पुरुषांच्या ५० मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाचा निशाणा साधला. त्याच गटात भारताच्या गुरपाल सिंगने रौप्यपदकावर मोहोर उमटवली.
जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या २६ वर्षीय जितू रायने १९४.१ गुण मिळवत राष्ट्रकुल स्पर्धेच्या पदार्पणातच सुवर्णपदक मिळवले. गुरपालने १८७.२ गुणांचा वेध घेत रौप्यपदकावर नाव कोरले. ऑस्ट्रेलियाच्या डॅनियल रेपाचोलीने कांस्यपदक पटकावले. या दोन पदकांमुळे आणि गगन नारंगच्या रौप्यपदकामुळे भारताची नेमबाजीतील पदकसंख्या १२वर पोहोचली आहे.
नेपाळच्या जितू रायने गेल्या महिन्यात जागतिक नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण तर ५० मीटर पिस्तूल प्रकारात रौप्यपदक पटकावले होते. राष्ट्रकुल स्पर्धेत तो पहिल्या फेरीनंतर तिसऱ्या क्रमांकावर होता, पण त्यानंतर जोमाने पुनरागमन करून त्याने वर्चस्व गाजवले. सातव्या फेरीनंतर जितूकडे सात गुणांची आघाडी होती. ही आघाडी त्याला सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी पुरेशी ठरली. शेवटच्या तीन फेऱ्यांमध्ये चांगली कामगिरी करून गुरपालने रौप्यपदक मिळवले तरी त्याला जितू रायला गाठता आले नाही. जितू राय आणि गुरपाल यांच्यात ६.९ गुणांचा फरक होता.
 वेटलिफ्टिंग
*शिवलिंगमला सुवर्ण ’रवीला रौप्य
भारताचा वेटलिफ्टर सतीश शिवलिंगमने राष्ट्रकुल स्पर्धेच्या पदार्पणातच सुवर्णपदक पटकावण्याची करामत केली. राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुषांच्या ७७ किलो वजनी गटात विक्रम नोंदवत त्याने ऐतिहासिक कामगिरी केली तर त्याचा सहकारी रवी काटुलू याने रौप्यपदकावर नाव कोरले.
गेल्या वर्षी राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या २२ वर्षीय सतीशने एकूण ३२८ किलो वजन उचलत सुवर्णपदकाला गवसणी घातली. रवीने ३१७ किलो वजन उचलत रौप्यपदक पटकावले. ऑस्ट्रेलियाच्या फ्रान्सिस इटोउंडीने ३१४ किलो वजनासह कांस्यपदकाची कमाई केली. सतीशने स्नॅच प्रकारात १४९ किलो वजन उचलत यापूर्वीचा युको पीटरच्या नावावर असलेला १४८ किलो वजनाचा विक्रम मागे टाकला. पहिल्याच प्रयत्नांत सतीशने १४२ किलो वजन उचलले, पण रवीला तितकेच वजन उचलण्यात अपयश आले. पण रवीने दुसऱ्या प्रयत्नांत १४२ किलो वजन उचलले. त्यानंतर १४६ आणि १४९ किलो वजन उचलत सतीशने स्पर्धाविक्रम नोंदवला.
क्लिन आणि जर्क प्रकारातही सतीश आणि रवीने शानदार कामगिरी केली. सतीशने १७९ किलो वजन उचलत अव्वल स्थान पटकावले. रवीचा १८५ किलो वजन उचलण्याचा प्रयत्न यशस्वी न झाल्यामुळे सतीशचे सुवर्णपदक निश्चित झाले. या कामगिरीसह भारतीय वेटलिफ्टर्सनी नवी दिल्लीतील (२०१०) राष्ट्रकुल स्पर्धेपेक्षा चांगली कामगिरी ग्लासगोमध्ये केली. भारताने आतापर्यंत तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यपदकांसह एकूण नऊ पदके मिळवली आहेत. नवी दिल्लीत भारतीय वेटलिफ्टर्सनी आठ (२-२-४) पदके मिळवली होती.
गगन नारंगला रौप्यपदक
भारताचा अव्वल नेमबाज आणि राष्ट्रकुलमध्ये आठ सुवर्णपदकांचा मानकरी असलेल्या गगन नारंगला पुरुषांच्या ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अतिशय रंगतदार ठरलेल्या अंतिम फेरीत नारंगने अखेपर्यंत कडवी लढत दिली. पण ऑस्ट्रेलियाचा अनुभवी नेमबाज वॉरेन पोटेंटने २०४.३ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. नारंगने २०३.६ गुणांसह दुसरा क्रमांक मिळवला. इंग्लंडच्या केनेथ पारने १८२ गुणांसह कांस्यपदक प्राप्त केले. नारंगचे हे राष्ट्रकुल स्पर्धेतील नववे पदक आणि पहिले रौप्यपदक ठरले. पात्रता फेरीत नारंगने ६२०.५ गुणांसह तिसरे स्थान पटकावले होते. जॉयदीप कर्माकरने ६१७ गुणांची कमाई केली, पण त्याला अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही.
बॅडमिंटन
भारत इंग्लंडकडून पराभूत
बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत भारताला इंग्लंडकडून ०-३ असा पराभव पत्करावा लागला. पारुपल्ली कश्यप आणि ज्वाला गट्टा या नावाजलेल्या खेळाडूंनाही आपली छाप पाडता आली नाही.
इंग्लंडच्या ख्रिस अ‍ॅडकॉक आणि गॅब्रिइले अ‍ॅडकॉक यांनी ज्वाला आणि अक्षय देवलकर यांना मिश्र दुहेरीच्या पहिल्या सामन्यात १६-२१, २१-१६, ११-२१ असे पराभूत केले. २०१० च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक पटकावणारा कश्यपवर एकेरीच्या लढतीत या वेळी दुसऱ्या गेममध्येच सामना गमावण्याची वेळ आली. राजीव ओऊसेफने कश्यपला २१-१६, २१-१९ असे पराभूत केले. तिसऱ्या पुरुष दुहेरीच्या सामन्यामध्ये ख्रिस आणि अ‍ॅण्ड्रय़ू इलिस यांनी अक्षय आणि प्रणव चोप्रा यांना १२-२१,२१-१३, २१-६ असे पराभूत केल्याने भारतावर ०-३ अशी नामुष्की ओढवली.
बॉक्सिंग
विजेंदर, देवेंद्रची आगेकूच; शिवा थापाचे आव्हान संपुष्टात
भारताचा ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता विजेंदरसिंग (७५ किलो) आणि युवा खेळाडू एल. देवेंद्रसिंग (४९ किलो) यांनी बॉक्सिंगमध्ये उपान्त्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. मात्र आशियाई विजेता शिवा थापाचे (५६ किलो) आव्हान संपुष्टात आले.
विश्वचषक स्पर्धेतील माजी कांस्यपदक विजेत्या विजेंदरने नामिबियाच्या मुजांदिजे कासुतो याच्यावर ३-० अशी मात केली. त्याने तीन फेऱ्यांअखेर प्रत्येक पंचाकडून दहा गुण मिळविले. गत वेळी विजेंदरला कांस्यपदक मिळाले होते. त्याला आता त्रिनिदाद व टोबॅको संघाच्या एरॉन प्रिन्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
देवेंद्रसिंगने श्रीलंकेच्या मदुशान गमागे याच्यावर २-१ असा निसटता विजय मिळविला. पहिल्या फेरीत देवेंद्रने आघाडी घेतली मात्र दुसऱ्या फेरीत तो मागे पडला. तिसऱ्या फेरीत मात्र पुन्हा देवेंद्र याने जोरदार खेळ करीत विजयश्री खेचून आणली. त्याला आता स्कॉटलंडच्या अकील अहमदशी खेळावे लागणार आहे.
शिवा थापाला ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या मायकेल कोन्लानकडून (उत्तर आर्यलड) पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या फेरीत कोन्लान याने ३०-२८ अशी आघाडी मिळविली. दुसऱ्या व तिसऱ्या फेरीत शिवाने चांगली लढत दिली मात्र कोन्लान याची आघाडी तो तोडू शकला नाही.
सुमित उपांत्यपूर्व फेरीत दाखल
राष्ट्रकुल स्पर्धेतील सुमित सांगवानने आपल्या अभियानाची विजयी सुरुवात केली आहे. सुमितने पुरुषांच्या ८१ किलो वजनी गटामध्ये मोहम्मद हकिमू फामू याच्यावर ३-० असा सहज विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले आहे. २१ वर्षीय सुमितने तिन्ही फेऱ्यांमध्ये आपले वर्चस्व राखले, त्यामुळे पंचांनी त्याला थेट विजयी घोषित केले. उपांत्यपूर्व फेरीत सुमितला मंगळवारी न्यूझीलंडच्या डेव्हिस नाइकाचा सामना करावा लागणार आहे.
अ‍ॅथलेटीक्स
पूवाम्मा, श्रद्धा, करहाना उपांत्य फेरीत
पूवाम्मा मचेट्टिरा, श्रद्धा नारायण यांनी अनुक्रमे महिलांच्या ४०० मीटर आणि १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत उपांत्य फेरीत स्थान मिळवले तर ओम प्रकाश सिंग करहाना याने गोळाफेक प्रकारात उपांत्य फेरीत मजल मारली. पूवाम्मा हिने ५४.०१ सेकंद अशी वेळ नोंदवत आठ जणींमधून तिसरे स्थान पटकावले. श्रीलंकेच्या चंद्रिका सुभाषिनी रसनायका मुदियानसेलागे हिने ५३.७५ सेकंदासह अव्वल स्थान पटकावले. श्रद्धा हिने महिलांच्या १०० मीटर शर्यतीत ११.३९ सेकंद अशी सर्वोत्तम वेळ नोंदवत उपांत्य फेरी गाठली. गुरगांवच्या करहानाने तिसऱ्या प्रयत्नांत १८.९८ मीटर अशी कामगिरी करत आगेकूच केली.
पॅराअ‍ॅथलीट जयदीपचे कांस्यपदक हुकले
भारताचा पॅराअ‍ॅथलीट जयदीपला थाळीफेकमध्ये चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्याने ३८.६८ मीटपर्यंत थाळीफेक केली, मात्र त्याची स्वत:ची ४१.१० मीटर ही सर्वोत्तम कामगिरी त्याला येथे करता आली नाही. या मोसमात त्याने ४०.४८ मीटर अशी कामगिरी करीत येथील पदकाकरिता अपेक्षा उंचावल्या होत्या.
टेबलटेनिस
भारताला पराभवाचा धक्का
टेबल टेनिसमधील भारताचा अव्वल खेळाडू अचंथा शरथ कमलसह भारतीय संघाला इंग्लंडकडून धक्का बसला. उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने भारताला ३-१ असे पराभूत केले. कमलला लिआम पिचफोर्डने ४-११, ११-८, ११-९, ५-११, ६-११ असे पाच गेममध्ये पराभूत करत भारताला पहिला धक्का दिला. दुसऱ्या सामन्यात भारताच्या पॉल ड्रिंकहॉलने अँथोनी अरपूथराजला ११-५, ११-८, ११-९ असे सहज पराभूत करत इंग्लंडला २-० अशी आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या सामन्यात अँथोनी आणि हरमीत देसाई यांनी पुरुष दुहेरीचा सामना ७-११, १६-१४, ११-८, ७-११, १३-११ असा जिंकल्यामुळे भारताच्या आशा कायम राहिल्या. निर्णायक सामन्यामध्ये पिचफोर्डने हरमीतला ११-५, ११-६, १०-१२, १०-१२, १७-१५ असे पराभूत केले.
कुस्ती
भरघोस पदकांची भारतीय मल्लांना आशा
ऑलिम्पिक पदक विजेते सुशीलकुमार व योगेश्वर दत्त यांच्यासह अनुभवी खेळाडूंचा समावेश असलेल्या भारतीय कुस्ती संघास येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भरघोस पदकांची आशा आहे. कुस्तीच्या लढतींना मंगळवारी प्रारंभ होत आहे. नवी दिल्ली येथे २०१० मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत फ्रीस्टाइलबरोबरच ग्रीकोरोमन विभागाचाही समावेश होता. त्या विभागात भारताने चार सुवर्णपदकांसह सात पदकांची कमाई केली होती. यंदा या स्पर्धेतून ग्रीकोरोमन विभागाच्या लढती वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे भारताच्या एकूण पदकांवर परिणाम होणार आहे. पण फ्रीस्टाइलमध्ये सुशील व योगेश्वर यांचा सहभाग असल्यामुळे या खेळात अजूनही भारतास वर्चस्वाची संधी आहे. या विभागात किमान दहा पदकांची भारताला अपेक्षा आहे.
हॉकी
पुरुषांपुढे गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान
लागोपाठ दोन सामन्यांमध्ये सहज विजय मिळविणाऱ्या भारतीय संघाला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या हॉकीत गतविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. भारताने पहिल्या सामन्यात वेल्स संघावर ३-१ अशी मात केली होती. त्यानंतर त्यांनी स्कॉटलंडचा ६-२ असा पराभव केला होता.