दबंग दिल्लीने बंगळुरू बुल्स संघाला रंगतदार लढतीत २९-२७ असा पराभवाचा धक्का दिला तर जयपूर पिंक पँथर्स संघाने पुणेरी पलटण संघावर ५०-२३ अशी एकतर्फी मात करत प्रो-कबड्डी लीगमध्ये आव्हान शाबूत राखले.
पहिल्या लढतीत दबंग दिल्लीने बंगळुरू संघाविरुद्ध प्रारंभापासूनच सामन्यावर पकड मिळविली होती. दहाव्या मिनिटालाच त्यांनी पहिला लोण चढविला. धारदार पकडी व खोलवर चढाया याच्या जोरावर पूर्वार्धात त्यांनी १५-१० अशी आघाडी घेतली होती. त्यावेळी हा सामना ते सहज घेतील अशी अपेक्षा होती. मात्र उत्तरार्धात बंगळुरू बुल्सच्या खेळाडूंनी चिवट झुंज देत सामन्यात रंगत आणली. शेवटची दहा मिनिटे बाकी असताना ते १६-२१ अशा पिछाडीवर होते. त्यावेळीही सामन्याचे पारडे दिल्लीकडे होते. तथापि ३३व्या मिनिटाला बंगळुरू संघाने लोण चढवित २२-२२ अशी बरोबरी केली. शेवटची चार मिनिटे बाकी असताना दिल्लीने पुन्हा २५-२३ अशी आघाडी मिळविली. बंगळुरूच्या सी.धर्मराज याने एकाच चढाईत दोन गुण मिळवत २७-२७ अशी बरोबरी साधली. मात्र पुन्हा दिल्लीने २९-२७ अशी आघाडी घेतली. हीच आघाडी ठेवीत त्यांनी सामना जिंकला. त्यांचा हा तिसरा विजय आहे.
दिल्लीच्या काशिलिंग आडकेने ७ गुण मिळवत चढाईचे पारितोषिक मिळविले. सुरजित नरवालने चढायांचे ४ गुण मिळविले. बंगळुरू संघाच्या अजय ठाकूर (६ गुण) व मनजित चिल्लर (४ गुण) यांनी चांगली लढत दिली.
पुणेरी पलटणविरुद्ध जयपूर संघाने निर्विवाद वर्चस्व गाजविले. ४-४ अशा प्रारंभीच्या बरोबरीनंतर त्यांनी आठव्या मिनिटाला ८-५ अशी आघाडी मिळविली. पाठोपाठ दोन मिनिटांनी त्यांनी पुण्यावर पहिला लोण चढविला. पूर्वार्धात त्यांनी आणखी एक लोण चढविला. पूर्वार्धात त्यांनी २९-१५ अशी भक्कम आघाडी घेतली. तेथेच सामन्याचा निकाल स्पष्ट झाला होता. भक्कम पकडी व जोरदार चढाया असा सुरेख खेळ करीत जयपूरने हा सामना ५०-२३ असा जिंकला.
आजचे सामने
दबंग दिल्ली वि. यु मुंबा,
पुणेरी पलटण वि. पाटणा पायरेट्स
वेळ : रात्री ८ वा. पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.