आठव्या दिवशीही अमेरिकेच्या खेळाडूंचे वर्चस्व

नेदरलॅण्ड्सची धावपटू डॅफने स्किपर्सने जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पध्रेतील २०० मीटर शर्यतीचे जेतेपद कायम राखण्यात यश मिळवले. मात्र अमेरिकेच्या युवा खेळाडूंनी वर्चस्व गाजवत स्पध्रेचा आठवा दिवस गाजवला. महिलांची लांब उडी आणि ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात अमेरिकन खेळाडूंनी सुवर्णपदकाची कमाई केली.

महिलांच्या १०० मीटर शर्यतीत कांस्यपदकावर समाधान मानावे लागल्यानंतर स्किपर्सकडून २०० मीटर शर्यतीत फार अपेक्षा ठेवल्या नव्हत्या. मात्र तिने हंगामातील सर्वोत्तम २२.०५ सेकंदांची वेळ नोंदवून सुवर्णपदक जिंकले. तिने आयव्हरी कोस्टच्या मॅरी-जोस टा लोयूवर (२२.०८ से.) सेकंदाच्या तीन शतांश फरकाने मात केली. टा लोयूचा हा राष्ट्रीय विक्रम ठरला. बहामाच्या शॉनी मिलर-युइबोला (२२.१५ से.) कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या पदकाच्या शर्यतींत महिलांच्या ३००० मीटर स्टीपलचेस प्रकाराने आश्चर्यजनक निकाल नोंदवला. केनियाचे चार धावपटू आघाडीवर असताना अमेरिकेच्या एमा कोबर्न आणि कर्टनी फ्रेरीच्स यांनी अनपेक्षित कामगिरी करताना अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले. कोबर्नने ९ मिनिटे ०२.५८ सेकंदांची नोंद केली, तर फ्रेरीच्सने सर्वोत्तम कामगिरी करताना ९ मिनिटे ०३.७७ सेकंदांची वेळ नोंदवली. गतविजेत्या केनियाच्या हायव्हीन जेपकेमोईला (९:०४.०३ से.) कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

‘‘या शर्यतीला काही शब्दच नाही. २०१५ आणि २०१६च्या शर्यतीच्या आठवणी अजूनही डोळ्यासमोर दिसत होत्या. त्यामुळे येथे सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील होते. मी स्वत:ला झोकून दिले होते आणि अखेरीस आलेल्या निकालाने मी समाधानी आहे. याहीपेक्षा जलद वेळ अपेक्षित होता,’’ असे कोबर्न म्हणाली.

अमेरिकेच्याच ब्रिटनी रिसेने जागतिक स्पध्रेत लांब उडी प्रकारात चौथे पदक नावावर केले. तिने यापूर्वी २००९, २०११ आणि २०१३च्या जागतिक स्पध्रेत सुवर्णपदक जिंकले होते. लंडन येथे शुक्रवारी तिने ७.०२ मीटर लांब उडी मारून चौथे सुवर्ण नावावर केले. डॅरिया क्लिशायना (७.०० मी.) आणि गतविजेती अमेरिकेची टायना बॅटरेलेट्टा (६.९७ मी.) यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

पोलंडच्या पाव्हेल फॅजडेकने जागतिक स्पध्रेतील सलग तिसरे सुवर्णपदक नावावर केले. पुरुषांच्या हातोडाफेक प्रकारात त्याने ७९.८१ मीटर कामगिरीस सुवर्णपदक नावावर केले.

‘‘लंडन स्टेडियमवर खेळण्याची संधी मिळावी यासाठी गेली पाच वष्रे प्रतीक्षा करत होतो. ऑलिम्पिक स्पध्रेत खेळता न आल्याचे दु:ख होते आणि हे सुवर्णपदक त्याची योग्य परतफेड करणारे आहे. जागतिक स्पध्रेतील तीन सुवर्णपदके हा एक इतिहास आहे आणि यापेक्षा काय अपेक्षा करू शकतो,’’ असे फॅजडेक म्हणाला. २०१२ आणि २०१६च्या ऑलिम्पिक स्पध्रेतील अंतिम फेरीत त्याला पात्र ठरता आले नव्हते.

या विजयासाठी फार संघर्ष केला. या वर्षांत घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळाले, याचा आनंद आहे. सलग दोन जागतिक स्पध्रेची जेतेपद पटकावणे विशेष आहे. हा विजय माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.  डॅफने स्किपर्स