विश्वचषकाचा आपण इतिहास पाहिला तर आतापर्यंत ‘डार्क हॉर्स’ म्हटल्या गेलेल्या काही संघांनी चमत्कारिक कामगिरी केली आहे. पण यंदाच्या विश्वचषकात या ‘डार्क हॉर्स’ संघांना विश्वविजयाची नामी संधी असेल, यामध्ये प्रामुख्याने दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड हे दोन देश असतील.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडे आपण पाहिले तर नेहमीच ते बलाढय़ वाटायचे आणि आताही त्यांचा संघ दमदार आहे. कर्णधार ए बी डी व्हिलियर्स हा भन्नाट फॉर्मात आहे, माझ्या मते तो या विश्वचषकामध्ये चांगल्या धावा करेल. पण त्याच्यापेक्षाही मला हशिम अमला हा या विश्वचषकामध्ये भरपूर धावा करेल, असे वाटते. कारण गेल्या चार वर्षांमध्ये सातत्याने त्याने चांगल्या धावा केल्या आहेत, पण तो खेळाडू कोणाच्या जास्त लक्षात आलेला नाही. त्याला सचिन तेंडुलकर किंवा रिकी पॉन्टिंगसारखी प्रसिद्धी मिळालेली नाही.अमलाला आतापर्यंत विश्वचषकात चांगली कामगिरी करता आलेली नसली तरी तो यंदाच्या स्पर्धेत नक्कीच चांगली फलंदाजी करेल, अशी मला आशा आहे. गोलंदाजीमध्ये न्यूझीलंडचे गोलंदाज सरस वाटतात, कारण ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टय़ांवर ताशी १४० किमीपेक्षा अधिक वेगाने जे गोलंदाजी करतील, त्यांचीच गोलंदाजी भेदक ठरेल. ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क चांगल्या फॉर्मात आहे, मिचेल जॉन्सन जर पूर्णपणे तंदुरुस्त असेल तर त्याची गोलंदाजी पाहायला मजा येईल. माझ्या मते मध्यमगती गोलंदाज आणि फिरकीपटूंचा या विश्वचषकामध्ये जास्त प्रभाव जाणवणार नाही.
विश्वचषकापूर्वीचा ऑस्ट्रेलिया दौरा हा भारतासाठी फार महत्त्वाचा असेल, हे मी गेल्या वर्षीच सांगितले होते. कारण विश्वचषकापूर्वीच्या या दौऱ्यात भारताकडून चांगली कामगिरी झाली असती तर त्यांचे मनोबल कमालीचे उंचावले असते. पण सध्याची त्यांची कामगिरी पाहता त्यांचे मनोबल खालावलेले आहे. आत्मविश्वास तळाला गेला आहे. भारताचे गोलंदाजही थकले आहेत, त्याचबरोबर दुखापतींचा ससेमिराही संघाच्या पाठीमागे लागला आहे. कोहली हा भारतासाठी सर्वात महत्त्वाचा फलंदाज आहे, पण त्याने तिसऱ्या स्थानावरच फलंदाजीला यायला हवे, असे माझे ठाम मत आहे. व्हिव्हियन रिचर्ड्स आणि रिकी पॉन्टिंग यांनी कधीही आपला तिसरा क्रमांक सोडला नव्हता आणि या क्रमांकावर त्यांची हुकूमत होती. त्यामुळे संघाने विराटला तिसऱ्या क्रमांकावर पाठवायला हवे आणि त्याच्याभोवती संघाचा खेळ गुंफायला हवा. कोहलीबरोबर रोहितचे फॉर्मात असणे संघासाठी गरजेचे आहे, कारण एकटय़ा कोहलीवर संघाला अवलंबून राहता येणार नाही. भारतीय संघ या विश्वचषकात बाद फेरीत सहजपणे पोहोचेल, पण त्यानंतर मात्र त्यांचे भवितव्य काय असेल, हे सांगता येणार नाही.
अमोल मुझुमदार, माजी क्रिकेटपटू आणि समालोचक

शब्दांकन :  प्रसाद लाड