वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूंचा मानधनाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. त्यामुळे पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकण्याच्या कॅरेबियन संघाच्या आशा मावळण्याची चिन्हे आहेत. या पाश्र्वभूमीवर वेस्ट इंडिजच्या ट्वेन्टी-२० संघाचा कर्णधार डॅरेन सॅमी यांनी मध्यस्थ हा एकमेव पर्याय आता उपलब्ध असेल, असे म्हटले आहे.
खेळाडूंनी रविवापर्यंत करारपत्रावर स्वाक्षऱ्या कराव्यात, अन्यथा सॅमीला कर्णधारपदावरून हटवण्यात येईल, अशी टोकाची भूमिका वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने घेतली आहे. भारतात ८ मार्चपासून सुरू होणाऱ्या प्रतिष्ठेच्या विश्वचषक स्पध्रेतून माघार घेण्याची सॅमीच्या नेतृत्वाखालील १५ सदस्यीय संघाची अजिबात इच्छा नाही, असे स्पष्ट संकेत यातून मिळत आहेत.
‘‘सामन्याचे मानधन दुप्पट (६९०० अमेरिकन डॉलर्स) करावे, प्रायोजकत्वाच्या रकमेतील ५० टक्के वाटा आणि बक्षीस रकमेतील १०० टक्के वाटा देण्यात यावा, अशी आमची मागणी क्रिकेट मंडळाने न स्वीकारल्यास मध्यस्थ हा एकमेव पर्याय तोडगा काढण्यासाठी उपलब्ध असेल,’’ असे सॅमीने सांगितले.

विंडीजच्या खेळाडूंना रिचर्ड्सचा पाठिंबा
दुबई : विश्वचषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा तोंडावर आली असताना मानधनासाठी झगडणाऱ्या वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना माजी कर्णधार विवियन रिचर्ड्स यांनी पाठिंबा दिला आहे. रविवारी दिलेल्या मुदतीत खेळाडूंनी करारपत्रावर स्वाक्षऱ्या केल्या नाहीत, तर दुसऱ्या फळीतील विंडीजचा संघ विश्वचषक स्पध्रेसाठी पाठवण्यात येईल, असा इशारा वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने दिला आहे.