सध्याचे स्टार, लोकप्रिय आणि सर्वाधिक महागडे खेळाडू कोण, असे कुणालाही विचारले तरी अर्जेटिनाचा लिओनेल मेस्सी आणि पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो यापैकीच एक उत्तर प्रत्येकाकडून ऐकायला मिळेल. पण कारकिर्दीच्या उत्तरार्धात असलेल्या डेव्हिड बेकहॅमने मेस्सी आणि रोनाल्डो या आताच्या दिग्गज खेळाडूंना मागे टाकत ३७ वर्षीही जगातील सर्वाधिक महागडा फुटबॉलपटू असल्याचा मान पटकावला आहे. यावरूनच इंग्लंडच्या या महान खेळाडूची जादू अद्याप ओसरली नसल्याचे दिसून येते.
फ्रान्समधील एका नियतकालिकेच्या अहवालानुसार, नुकताच पॅरिस सेंट-जर्मेन संघाशी छोटय़ा कालावधीसाठी करारबद्ध झालेला बेकहॅम हा आताही सर्वाधिक मिळकत असणारा फुटबॉलपटू ठरला आहे. लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यापेक्षा बेकहॅमचे मानधन सर्वाधिक आहे. बेकहॅमची २०१२-१३मधील वार्षिक कमाई ३६ दशलक्ष युरोइतकी आहे. चार वेळा बलॉन डी’ऑर (जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू) पुरस्कार पटकावणाऱ्या मेस्सीपेक्षा ती जास्त आहे. डिसेंबर महिन्यात लॉस एंजेलिस गलॅक्सी संघाला सोडचिठ्ठी देणाऱ्या बेकहॅमने वर्षांला १.७ दशलक्ष युरोइतके मानधन घेतले होते. त्यानंतर १.३ दशलक्ष युरो त्याला बोनसरूपाने तर ३३ दशलक्ष युरो जाहिराती आणि अन्य मार्गातून मिळाले होते.
पॅरिस सेंट-जर्मेन संघाशी करारबद्ध झालेल्या बेकहॅमने या वर्षांतील सर्व मानधन एका स्वयंसेवी संस्थेला देण्याची घोषणा याआधीच केली आहे. मेस्सीने गेल्या मोसमात ३५ दशलक्ष युरोची कमाई केली. त्यात १३ दशलक्ष युरो पगाराच्या रूपाने तर अन्य रक्कम त्याला जाहिराती आणि अन्य करारांमधून मिळाली होती. रोनाल्डोने गेल्या मोसमात ३० दशलक्ष युरोची कमाई केली होती. रिअल माद्रिदचे प्रशिक्षक जोस मॉरिन्हो हे सर्वाधिक कमाई असलेले प्रशिक्षक ठरले आहेत. गेल्या मोसमात त्यांना करारापोटी १४ दशलक्ष युरो मिळाले होते. पॅरिस सेंट-जर्मेनचे प्रशिक्षक कालरे अँकलोट्टी यांना १२ दशलक्ष युरो तर चीनमधील गुआंगझाअु एव्हरग्रान्डे संघाचे प्रशिक्षक मार्सेलो लिप्पी यांना ११ दशलक्ष युरो इतकी रक्कम मिळाली होती.
सर्वाधिक कमाई असलेले पाच फुटबॉलपटू
खेळाडू    संघ        मिळकत
डेव्हिड बेकहॅम    पॅरिस सेंट-जर्मेन    ३६ दशलक्ष युरो
लिओनेल मेस्सी    बार्सिलोना        ३५ दशलक्ष युरो
ख्रिस्तियानो रोनाल्डो    रिअल माद्रिद        ३० दशलक्ष युरो
फर्नाडो टोरेस    चेल्सी        १६.३ दशलक्ष युरो
डेव्हिड सिल्व्हा    मँचेस्टर सिटी        १६.२ दशलक्ष युरो