व्हिक्टोरिया अ‍ॅडम्स हिच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर डेव्हिड बेकहॅमच्या खेळातली एकाग्रता हरपली आहे, असे परखड मत मँचेस्टर युनायटेडचे माजी प्रशिक्षक आणि बेकहॅमच्या कारकीर्दीत मोलाची भूमिका बजावणारे अ‍ॅलेक्स फग्र्युसन यांनी व्यक्त केले. तब्बल २७ वर्षे मँचेस्टर युनायटेडच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळल्यानंतर काही महिन्यांपूर्वी फग्र्युसन निवृत्त झाले. बेकहॅमच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात फग्र्युसन यांनी त्याला मार्गदर्शन केले होते. मात्र २००३मध्ये दोघांमधील संबंध विकोपाला गेल्यानंतर बेकहॅमने मँचेस्टर युनायटेडला सोडचिठ्ठी देऊन रिअल माद्रिद संघाशी करार केला होता.  बेकहॅमच्या सध्याच्या कामगिरीविषयी फग्र्युसन म्हणाले, ‘‘पॉप गायिका व्हिक्टोरिया अ‍ॅडम्सशी विवाह केल्यानंतर ही जोडी सेलिब्रेटी जोडपे बनली आहे. त्यांच्या जीवनशैलीत मूलभूत बदल झाला आहे. याचा स्पष्ट परिणाम बेकहॅमच्या खेळावर दिसून येत आहे. फारसा नावलौकिक नसलेल्या लॉस एंजेलिस गॅलेक्सी संघाशी बेकहॅमसारख्या खेळाडूने करार करणे हे माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे.’’  ‘‘१२ वर्षांचा असताना त्याला मी मँचेस्टर युनायटेड संघात समाविष्ट केले होते. तेव्हा त्याला सरावाची आवड होती. सवरेत्कृष्ट फुटबॉल खेळण्यासाठी तो कायम सज्ज असायचा. त्याच्या सरावात कधीही खंड पडला नाही. लग्नानंतर त्याच्या कारकिर्दीला उतरती कळा लागल्याचे मला वाटते,’’ असे फग्र्युसन म्हणाले.