सुमार प्रदर्शनासाठी मँचेस्टर युनायटेड क्लबने प्रशिक्षक डेव्हिड मोयस यांची हकालपट्टी केली. त्यानंतर इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेतील तगडा संघ असलेल्या मँचेस्टर युनायटेडच्या प्रशिक्षक पदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू झाली आहे, मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रिअल माद्रिदचे प्रशिक्षक कालरे अ‍ॅन्सेलोटी यांचे नाव अग्रस्थानी आहे. बहुसंख्य ब्रिटिश वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार मोयस यांची जागा घेण्यासाठी सर्वाधिक पसंती अ‍ॅन्सेलोटी यांच्या नावाला आहे. त्यांच्या बरोबरीने नेदरलँण्ड्सचे ल्युईस व्हॅन गाल यांच्या नावाचीही चर्चा आहे. मोयस यांची हकालपट्टी झाल्यानंतर सगळ्यात आधी गाल यांचेच नाव समोर आले होते.
कारकिर्दीत चेल्सी क्लबचे प्रशिक्षकपद सांभाळणारे अ‍ॅन्सेलोटी सध्या रिअल माद्रिद या बलाढय़ क्लबचे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. रिअल माद्रिदशी त्यांचा तीन वर्षांचा करार असून, पदभार स्वीकारून त्यांना केवळ वर्षभराचाच कालावधी झाला आहे. तर दुसरीकडे नेदरलँण्ड्सचे व्यवस्थापक असलेले गाल यांचा कार्यकाळ २०१४च्या विश्वचषकानंतर संपत आहे. या पाश्र्वभूमीवर आणि व्यवहार्य समीकरणे लक्षात घेता गाल यांच्या नावाला अंतिम मान्यता मिळू शकते. विशेष म्हणजे स्वत: गाल यांनी मँचेस्टर युनायटेडचे व्यवस्थापकपद स्वीकारण्यात स्वारस्य दाखवले आहे.