चेक प्रजासत्ताकविरुद्ध दोन वर्षांपूर्वी प्ले-ऑफ लढतीत आम्ही खेळलो होतो. त्या तुलनेत यंदाच्या कॅनडाविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे, असे भारताचा डेव्हिस चषक टेनिस संघाचा कर्णधार महेश भूपतीने सांगितले.

भारत व कॅनडा यांच्यात एडमंटन येथे १५ ते १७ सप्टेंबर दरम्यान डेव्हिस लढत होणार आहे. या लढतीसाठी पूर्वतयारी म्हणून भारतीय संघाचे सराव शिबीर अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात आयोजित करण्यात आले होते.

सराव शिबिरानंतर भूपती म्हणाला, ‘‘उज्ज्वल भवितव्य असलेला डेनिस शापोव्हालोव्हचा कॅनडाच्या संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हा संघ अतिशय बलवान झाला आहे. त्याच्याबरोबरच व्हासेक पोस्पिसिल, डॅनियल नेस्टॉर व ब्रेडेन श्नूर यांचाही कॅनडाच्या संघात समावेश आहे. शापोव्हालोव्हने नुकत्याच झालेल्या अमेरिकन स्पर्धेत चौथ्या फेरीपर्यंत मजल गाठली होती. १८ वर्षीय शापोव्हालोव्हने यंदा माँट्रियल येथील स्पर्धेत राफेल नदालवर मात केली होती. त्याच्याबरोबरच नेस्टॉर हादेखील अव्वल दर्जाचा खेळाडू आहे. हे लक्षात घेता आम्हाला त्यांच्याविरुद्ध गांभीर्याने व सकारात्मक दृष्टिकोन ठेवत खेळावे लागणार आहे.’’

न्यूयॉर्कमधील शिबिराबाबत भूपती म्हणाला, ‘‘कोलंबिया विद्यापीठात आयोजित केलेल्या सराव शिबिरामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला आहे. कॅनडामधील लढत इनडोअर स्टेडियममध्ये होणार असल्यामुळे आम्ही त्यानुसारच सराव केला होता. युकी भांब्री व रामकुमार रामनाथन यांनी या मोसमात चांगली कामगिरी केली असल्यामुळे आमची त्यांच्यावर भिस्त आहे. युकीने सिटी खुल्या टेनिस स्पर्धेत २२व्या मानांकित गेल मोन्फिल्सवर विजय मिळवला होता तर रामकुमारने अन्ताल्या खुल्या स्पर्धेत डॉमिनिक थिएमला पराभवाचा धक्का दिला होता. त्यांची ही कामगिरी जागतिक क्रमवारीतील पहिल्या १०० खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्यासाठी पूरक आहे. रोहन बोपण्णानेही यंदा भरपूर सामने जिंकले आहेत. युकी व रामकुमार यांना काही वेळा तंदुरुस्तीच्या समस्येने ग्रासले होते, तरीही आता या लढतीसाठी ते पूर्णपणे तंदुरुस्त आहेत.’’

‘‘कॅनडाच्या खेळाडूंना स्थानिक मैदान, वातावरण व प्रेक्षक यांचा फायदा मिळणार आहे. त्यामुळेच आम्ही मानसिक कणखरपणावर भर दिला आहे,’’ असे भूपतीने सांगितले.