खेळाडूंच्या विनंतीला मान देत अखिल भारतीय टेनिस संघटननेने (आयटा) डेव्हिस चषकातील चेक प्रजासत्ताकविरुद्धच्या ‘प्ले ऑफ’ लढतीसाठी दिल्लीची निवड केली आहे. १८ ते २० सप्टेंबर या कालावधीत ही लढत रंगणार आहे. या लढतीसाठी दिल्ली आणि पुणे यांच्यात आयोजनासाठी चुरस होती. मात्र बहुतांशी खेळाडूंनी दिल्लीला प्राधान्य दिल्याने राजधानीला आयोजनाची पसंती मिळाली.
दिल्लीतील आर. के. खन्ना टेनिस स्टेडियममध्ये या लढती होणार आहेत. पुण्यात वातावरण उष्ण असते आणि आद्र्रताही जास्त असते. ही परिस्थिती चेक प्रजासत्ताकच्या खेळाडूंना अनुकूल होईल. भारतीय खेळाडूंना नाही. त्यामुळे पुण्याऐवजी दिल्लीला प्राधान्य देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दिल्लीच्या खन्ना स्टेडियमधील संथ कोर्टवर सोमदेवने एकही लढत गमावलेली नाही. आयटाचे अध्यक्ष अनिल खन्ना, महासचिव भरत ओझा आणि बंगाल टेनिस संघटनेचे अध्यक्ष हिरॉनमय चटर्जी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर आयोजनाचा निर्णय घेण्यात आला.