भारत हा क्रिकेटवेडा देश आहे, असं आपण म्हणतो आणि त्याचा प्रत्ययही बऱ्याचदा आपल्याला आलेला आहे. काही वेळा तर हातातली कामं सोडून लोक क्रिकेटचा सामना पाहतात. रस्त्यावर नीरव शांतता पसरलेली आपण सामन्याच्या दिवशी अनुभवतोही. आपण क्रिकेटला एवढं डोक्यावर घेतलं की, काही जणांच्या मते क्रिकेट हा भारतात धर्म आहे आणि क्रिकेटपटू देव; पण सध्या भारतात आणि खास करून दर्दी क्रिकेटवेडय़ा मुंबईत सुरू असलेल्या महिला विश्वचषक मात्र या साऱ्या गोष्टींना अपवाद ठरताना दिसतो. महिला विश्वचषकाकडे सर्वसामान्य प्रेक्षक फिरकताना दिसत नाही, यावरून भारत हा क्रिकेट या खेळाचा वेडा आहे, की त्यामागच्या ग्लॅमरचा, हा प्रश्न उपस्थित होतो. दुसरीकडे लोकांना विश्वचषक सुरू आहे, हेच माहिती नाही अशी काही भागांत परिस्थिती आहे. त्यामुळेच महिला विश्वचषकाला प्रसिद्धी देण्यात आयसीसी आणि बीसीसीआय नापास झाल्याचेच चित्र दिसत आहे.
महिला विश्वचषकाला सुरुवात झाली ती १९७३ पासून म्हणजेच पुरुषांच्या विश्वचषकाच्या दोन वर्षांपूर्वी. त्यानंतर आता चाळिशी गाठताना महिला विश्वचषकाचा वेलू गगनावर जायला हवा होता. चाळीस वर्षांपूर्वी लावलेल्या या रोपाचा आता कल्पवृक्ष व्हायला हवा होता, पण तसे झालेले दिसत नाही. अजूनही महिलांचे क्रिकेट पुरुषांच्या बऱ्याच पटींनी मागे आहे. पुरुषांना जेवढी लोकप्रियता, पैसा, ग्लॅमर या साऱ्या गोष्टी मिळतात, त्या अजूनही महिलांच्या वाटय़ाला आलेल्या नाहीत. विश्वचषक सोडा, साध्या आयपीएलच्या सामन्यांना स्टेडियम पूर्णपणे भरलेले असते, पण महिला विश्वचषकाला प्रवेश मोफत असूनही ही संख्या १००-१५० च्या पुढे जाताना दिसत नाही.
दोन वर्षांपूर्वीचा, म्हणजेच भारतात झालेला २०११ चा विश्वचषक आठवून बघा. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी जवळपास दोन महिन्यांपूर्वी जाहिरातींना सुरुवात झाली होती. प्रेक्षकांच्या मनावर ठासून बिंबवलं जात होतं, की काही दिवसांतच विश्वचषकाला सुरुवात होतेय. प्रत्येक शहरामध्ये जाहिराती सुरू होत्या, पण सध्याच्या घडीला महिलांचा विश्वचषक मुंबईत सुरू झालाय, याची माहिती बऱ्याच मुंबईकरांना नाही. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये विश्वचषकाचा पहिला सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात आला, पण या वेळी स्टेडियमच्या बाहेरही साधी जाहिरात नव्हती. लोकांना स्टेडियममध्ये काय चालू आहे, हेदेखील माहिती नव्हते. आयसीसीला आणि बीसीसीआयला जे दोन वर्षांपूर्वी जमलं ते या वेळी का जमलं नाही, हा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. आयसीसी आणि बीसीसीआय महिला क्रिकेटची उपेक्षा करत असल्याचेच या वेळी जाणवते.
विश्वचषकाच्या वेळी धोनी, सेहवाग, गंभीर, कोहली हॉटेलमधून रस्त्यावरून चालत स्टेडियमला जात आहेत, अशी कल्पनाही आपण करू शकत नाही; पण भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या बाबतीत मात्र हे घडलेलं आहे. यावरूनच पुरुष व महिला क्रिकेटपटूंमध्ये दुजाभाव होत असल्याचे दिसून येते. जिथे एवढय़ा साध्या गोष्टीमध्ये फरक केला जातो, तिथे अन्य सोयीसुविधांबाबत काय परिस्थिती असेल याचा अंदाज येऊ शकतो.
महिला विश्वचषकाचे काही सामने वानखेडे मैदानावर होणार होते, तसं वेळापत्रकही ठरवण्यात आलं होतं, पण मुंबईच्या संघाने रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आणि हा सामना वानखेडेवर खेळवण्यात आला व त्यासाठी विश्वचषकाचे सामने वानखेडेवरून रद्द करण्यात आले. पुरुषांच्या स्थानिक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आणि महिला विश्वचषकाचे सामने यामध्ये कोणाचं पारडं जड ठरायला हवं होतं आणि कोणतं ठरलं हे साऱ्यांपुढे आहे. महिला विश्वचषकाचे सामने आता एमआयजी क्लब आणि बीकेसी येथील मैदानांवर होणार आहेत. या मैदानांवर रणजीची अंतिम फेरी ठेवण्यात आली असती का? रणजीचं सोडा, साधे आयपीएलचे सामने तिथे भरवले जाऊ शकतात का? तर याचे उत्तर नाही असेच मिळेल, कारण अजूनही जेवढं महत्त्व आपले क्रिकेट मंडळ पुरुषांच्या सामन्यांना देते तेवढे महिलांच्या सामन्यांना देत नाही. पुरुषांच्या क्रिकेटला वलय आहे, पैसा, प्रसिद्धी आहे आणि त्यामुळेच त्यांच्याकडे जास्त लक्ष दिले जाते. महिला क्रिकेटकडे यापैकी काहीच नाही आणि त्यामुळेच त्यांच्याकडे कानाडोळा केला जातोय, फक्त औपचारिकता म्हणून हा विश्वचषक भरवला जात असल्याचेच जाणवतं आहे. आयसीसी आणि बीसीसीआय या दोन्ही संस्था काही नफा मिळविण्यासाठी बनवण्यात आलेल्या नाहीत. क्रिकेटचे भले व्हावे, यासाठी या दोन्ही संस्थांनी काम करायला हवं. पुरुषांच्या क्रिकेटमधून आयसीसी आणि बीसीसीआय बक्कळ पैसा कमवते, त्याचा विनियोग त्यांनी महिलांसाठी करायला हवा. काही दिवसांपूर्वी देशांतर्गत क्रिकेटला चालना मिळण्यासाठी आयसीसीने न्यूझीलंडला मदत केली, पण महिला क्रिकेटच्या विकासाचे काय? महिला क्रिकेट अजूनही हवे तसे विकसित झालेले नाही. आयसीसी महिलांसाठी किती आणि कुठे स्पर्धा घेते, वर्षांतून किती स्पर्धा खेळवल्या जातात, याची माहिती बऱ्याच जणांना नाही. स्पर्धा खेळवल्याने खेळ वाढेल आणि त्याला प्रसिद्धी दिल्याने ग्लॅमर आणि पैसाही महिला क्रिकेटकडे वळू शकतो, पण त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. बीसीसीआयची गोष्टदेखील काही निराळी नाही. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये ते एवढे व्यस्त आहेत की, महिला क्रिकेटपटूंकडे त्यांना बघायला वेळ नाही. दर वर्षी न चुकता बीसीसीआय आयपीएलचे सामने भरवते, पण महिलांचे किती सामने भरवते ही माहिती बऱ्याच जणांना नाही.
विश्वचषकाच्या सामन्यात चांगली कामगिरी होऊनही प्रेक्षकांचा पाठिंबा मिळत नाही, ही गोष्ट नक्कीच महिला क्रिकेटपटूंना बोचत असेल. २००५ साली आयसीसीने महिला क्रिकेटला पुरुषांबरोबर एकाच पंक्तीत बसवले खरे, पण ती समानता प्रयत्नांमध्ये दिसत नाही. भारताचा विचार केल्यास माजी महिला क्रिकेटपटूंनी या प्रश्नांना वाचा फोडायला हवी, पण बऱ्याच माजी महिला क्रिकेटपटू असोसिएशन्सशी संलग्न असल्याने हे प्रश्न त्यांना मांडता येत नाहीत. माजी क्रिकेटपटूंनी स्वत:चा विचार करण्यापेक्षा खेळाचा विचार करायला हवा. पुरुषांप्रमाणे महिलांच्या क्रिकेटलाही वलय, प्रसिद्धी, पैसा मिळायला हवा, पण त्यासाठी प्रामाणिक आणि ठोस प्रयत्न व्हायला हवेत, तरच महिला क्रिकेट फुलेल, बहरेल. पुन्हा चार वर्षांनी होणाऱ्या विश्वचषकात हेच चित्र पाहायला मिळू नये हीच अपेक्षा असेल. सध्या तरी ‘दिसं जातील, दिसं येतील’ हे म्हणण्यापलीकडे महिला खेळाडूंकडे पर्यायच नाही.