करूया उद्याची बात
१ जानेवारी २०१३- क्रीडा
खेळ म्हटला की त्यामध्ये जय आणि पराजय आलाच, पण या वर्षी भारताला ऑलिम्पिकच्या पदकांचा अपवाद वगळता जास्त आनंदाचे क्षण वाटय़ाला आलेच नाही. क्रिकेट, हॉकी आणि यांसारख्या अन्य खेळांमध्येही भारताच्या पदरी बहुतांशी निराशाच पडली. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघाने भारतीय ऑलिम्पिक संघटनेवर बंदी घालणं हे भारतासाठी नक्कीच लज्जास्पद ठरलं, त्याचबरोबर अन्य खेळांच्या संघटनेतील सावळा गोंधळ पाहता अन्य संघटनांचेही काही खरे दिसत नाही. यामुळे देशाची लक्तरे वेशीवर टांगली आहेत, तर यामुळे मोठे नुकसान खेळ आणि खेळाडूंचे होणार आहे. २०१२ हे वर्ष भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी नक्कीच चांगले गेले नाही, पण रात्रीच्या गर्भात उद्याचा उष:काल असतो, असे म्हणतात. त्यानुसार हे दिवसही जातील आणि प्रमाणिक योगदान दिल्यास चांगले दिवसही आगामी वर्षी आपल्याला अनुभवायला मिळू शकतील.
आता दिवस-रात्र कसोटी
आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) घेतलेल्या निर्णयानुसार कसोटी क्रिकेटमध्ये बदल करण्यात येणार असून आता दिवस-रात्र कसोटी सामन्याचा आनंद प्रेक्षकांना लुटता येणार आहे. यापूर्वी इंग्लंडविरुद्ध कोलकाता येथील इडन गार्डन्समध्ये झालेल्या सामन्यामध्ये काही प्रमाणात हा प्रयोग करण्यात आला होता. हा प्रयोग यशस्वी झाला तर कसोटी क्रिकेटची रंजकता आणखी वाढायला मदत होईल.

सचिनची कसोटीमधूनही निवृत्तीची शक्यता
एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत विश्वविक्रमांचा अनभिषिक्त सम्राट असलेल्या सचिन तेंडुलकरने साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या वर्षी होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी न झाल्यास सचिन कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती घेण्याची दाट शक्यता आहे.
त्यामुळे या वर्षी सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पूर्णविराम देण्याची चिन्हे आहेत.

* चॅम्पियन्स क्रिकेट करंडक
६ ते २३ जून २०१२- इंग्लंड
* इंग्लिश संघ एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय दौऱ्यावर
११, १५, १९, २३, २७ जानेवारी २०१२

कबड्डी
विश्वचषक कबड्डी स्पर्धा : २५ ते ३१ मार्च २०१३
विजयवाडा येथे विश्वचषक कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा रंगणार आहे. या स्पध्रेत जपान, इराण, कोरिया, ब्रिटन, अमेरिका यांच्यासह १६ देशांचे संघ सहभागी होणार आहेत. एकंदर एक कोटी रुपयांची बक्षिसे स्पध्रेसाठी ठेवण्यात आली आहेत.

भारतीय कुस्ती लीग – ६ नोव्हेंबरपासून
कुस्ती
अनेक लीग स्पर्धाप्रमाणेच आता कुस्तीतही भारतीय कुस्ती लीग स्पर्धा ६ नोव्हेंबरपासून घेतली जाणार आहे. सहा फ्रँचायझींचा समावेश असलेल्या या स्पर्धेत घरच्या आणि बाहेरच्या मैदानावर असे ३० लीग सामने होणार आहेत.

इंडियन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यत
इंडियन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीचे पहिले दोन मोसम कमालीचे यशस्वी ठरल्यानंतर आता मोटारचाहत्यांना उत्सुकता लागली आहे ती तिसऱ्या पर्वाची. रेड बुलचा ड्रायव्हर सेबॅस्टियन वेटेल जेतेपदाची हॅट्ट्कि साजरी करतो की नाही, याकडे तमाम चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
इंडियन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यत- २५ ते २७ ऑक्टोबर

२०१३ दक्षिण आशियाई स्पर्धा
१२वी दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा फेब्रुवारी महिन्यात दिल्ली येथे रंगणार आहे. तीन वेळा या स्पर्धेचे आयोजन करणारा भारत हा बांगलादेशनंतर पहिला देश ठरला आहे. दिल्लीत पहिल्यांदाच ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका हे देश सहभागी होणार आहेत.

 खो-खो
आशियाई खो-खो स्पर्धा फेब्रुवारीमध्ये इंदोर येथे मॅटवर रंगणार आहे.
टेनिस
ऑलिम्पिकसारख्या सर्वोच्च क्रीडा सोहळ्यासाठी टेनिस संघाच्या निवडीवरून यंदा रणकंदन माजले. या तमाशाने नामुष्कीव्यतिरिक्त काहीच साधले नाही. पेस, भूपती यांच्यासाठी हे वर्ष शेवटचे असणार आहे. कारकीर्दीचा शेवट गोड व्हावा यासाठी ते करणार हे बघणे रंजक ठरणार आहे. नवीन साथीदारासह खेळायचे असल्यामुळे नवीन वर्ष रोहन बोपण्णासाठी आव्हानात्मक असणार आहे. वाद बाजूला ठेवून सानिया मिर्झा आपल्या क्षमतेला न्याय देऊ शकते हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

चेन्नई खुली स्पर्धा- ३१ डिसेंबर २०१२ ते ६ जानेवारी २०१३
ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा- १४ ते २७ जानेवारी
फ्रेंच खुली स्पर्धा- २६ मे ते ९ जून
विम्बल्डन-२४ जून ते ७ जुलै
अमेरिकन खुली स्पर्धा-
२६ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर

बॅडमिंटन
ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धा- ५ ते १० मार्च
आशियाई अजिंक्यपद स्पर्धा- १६ ते २१ एप्रिल
इंडिया ओपन- २३ ते २८ एप्रिल
इंडियन बॅडमिंटन लीग- २४ जून ते ११ जुलै
जागतिक अजिंक्यपद स्पर्धा-४ ते ११ ऑगस्ट

हॉकी
वर्ल्ड सीरिज हॉकी स्पर्धेनंतर आता भारतीय हॉकीच्या इतिहासात दुसरी हॉकी लीग स्पर्धा सुरू होतेय ती हॉकी इंडिया लीगच्या रूपाने. भारतीय हॉकी संघटना आणि हॉकी इंडिया यांच्यात देशातील हॉकीसाठी सत्तासंघर्ष सुरू असतानाच हॉकी इंडियाच्या या स्पर्धेत देशातील आणि जगभरातील अव्वल हॉकीपटू सहभागी होणार आहेत. दिल्ली, लखनौ, मुंबई, जालंधर आणि रांची या पाच फ्रँचायझींमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे.

*  हॉकी इंडिया लीग – १४ जानेवारी ते १० फेब्रुवारी
* ज्युनियर हॉकी विश्वचषक स्पर्धा- ६ ते १५ डिसेंबर
* १० वी ज्युनियर हॉकी विश्वचषक स्पर्धा ६ ते १५ डिसेंबरदरम्यान भारतात रंगणार आहे. १६ संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत यजमान देश या नात्याने भारताचा सहभाग निश्चित झाला आहे.