कर्नाटकचा आंतरराष्ट्रीय मास्टर एम.एस.तेजकुमार याने श्रीमहेश्वरानंद सरस्वती स्मृती चषक अखिल भारतीय बुद्धिबळ स्पर्धेतील पाचव्या फेरीअखेर एकटय़ाने आघाडी घेतली आहे. त्याचे पाच गुण झाले आहेत. पश्चिम बंगालचा देबश्री मुखर्जी याने चौथ्या फेरीत आंतरराष्ट्रीय मास्टर स्वप्नील धोपाडे याला हरविले व पाठोपाठ त्याने पाचव्या फेरीत आंतरराष्ट्रीय मास्टर राहुल संगमा याला बरोबरीत रोखले आणि लक्षवेधक कामगिरी केली.
मनोहर मंगल कार्यालयात बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टने ही स्पर्धा आयोजित केली आहे. पाचव्या फेरीत तेजकुमारने महाराष्ट्राच्या राकेश कुलकर्णी याच्यावर निसटता विजय मिळविला. त्याने तीन तास चाललेली ही लढत ४४ व्या खेळीत जिंकली. त्याने क्वीन्स गॅम्बिट तंत्राचा कल्पकतेने उपयोग केला. या फेरीअखेर समीर कठमाळे, हिमांशु शर्मा, देबश्री मुखर्जी, अभिषेक केळकर, सयान बोस, एस.श्रीनाथ राव, स्नेहल भोसले या सात खेळाडूंनी दुसरे स्थान घेतले आहे. त्यांचे प्रत्येकी साडेचार गुण झाले आहेत. चौथ्या फेरीत पराभूत होणाऱ्या धोपाडे याने पाचव्या फेरीत मात्र विजय मिळवीत आव्हान राखले. त्याने गुजरातच्या शैलेश रावळ याच्यावर मात केली.
कठमाळे व शर्मा यांच्यात झालेला रंगतदार डाव बरोबरीत सुटला. पुण्याच्या अभिषेक केळकर याने सोनी कृष्णनविरुद्ध सफाईदार विजय मिळविला. बंगालचा खेळाडू बोस याने प्रणव शेट्टी याला हरविले तर महिला ग्रँडमास्टर ऋचा पुजारी हिने दिल्लीच्या साहिल टिक्कू याला बरोबरीत ठेवले. श्रीनाथ राव याने रोहन जोशी याचा पराभव केला. प्रतीक शेणवी याने रोशन रंगराजन याला चुरशीच्या लढतीनंतर बरोबरीत रोखले.