जागतिक विक्रमाशी बरोबरी करणाऱ्या भारताच्या दीपिका कुमारीला गुरुवारी तिरंदाजी विश्वचषक स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. अव्वल मानांकित दीपिकाने महिला रिकव्‍‌र्ह वैयक्तिक गटात ६८६ गुणांची कमाई करून जागतिक विक्रमाशी बरोबरी केली होती आणि त्यामुळे तिला तिसऱ्या फेरीत पुढेचाल मिळाली. मात्र, उपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कच्या माजा जॅगरने ६-४ अशा विजयासह दीपिकाची घोडदौड थांबवली. २-२ अशा बरोबरीनंतर जॅगरने तिसऱ्या अणि चौथ्या फेरीत बाजी मारून ६-२ अशी आघाडी घेतली आणि सामना जिंकला.
दीपिकासह भारताच्या लक्ष्मीराणी माझी आणि जयंत तालुकदार यांनाही आपापल्या गटाच्या उपांत्यपूर्व फेरीतच पराभव पत्करावा लागला. त्यामुळे वैयक्तिक प्रकारात एकही भारतीय पदकाच्या शर्यतीत राहिलेला नाही. भारताला तीन सांघिक प्रकारात आणि एका मिश्र प्रकारात पदक जिंकण्याची संधी आहे. माझीला उपांत्यपूर्व फेरीत तैपेईच्या टॅन या-टिंगकडून २-६ असा, तर रिमिल बुरियुलीलाही कोरियाच्या किम चॅएयुनकडून १-७ असा पराभव पत्करावा लागला. तालुकदारची घोडदौड तैपेईच्या वेई चून-हेंगने रोखली. पाचव्या मानांकित हेंगने ६-४ असा विजय मिळवला.