चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी विश्वचषकात भारतीय तिरंदाज दीपिका कुमारीने अचूक लक्ष्यवेध करत जागतिक विक्रमाशी बरोबरी साधली आहे. २१ वर्षीय दीपिकाने तिरंदाजी विश्वचषकात महिलांच्या रिकर्व्ह इव्हेंटमध्ये ७२० पैकी ६८६ गुण कमावत दक्षिण कोरियाची तिरंदाज को बो बे हिच्या २०१५ सालच्या विक्रमाशी बरोबरी केली. दीपिकाने एक गुण जास्त मिळवला असता तर महिला तिरंदाजी विश्वचषकात नवा विश्वविक्रम प्रस्थापित झाला असता.
दीपिकाला रिओ ऑलिम्पिक स्पर्धेचेही तिकीट मिळाले आहे. त्यामुळे ऑलिम्पिक पूर्वीच मिळालेल्या या महत्तवपूर्ण यशामुळे दीपिकाच्या आत्मविश्वासात आणखी भर पडली आहे. २०११, २०१२ आणि २०१३ साली दीपिकाने तिरंदाजी विश्वचषकात रौप्यपदकाची कमाई केली होती. नुतकेच तिला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते. २०१० साली राष्ट्रकूल स्पर्धेतही तिने वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली, तर आशियाई क्रीडा स्पर्धेत तिला कांस्य पदक मिळाले होते.