आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घालणाऱ्या दीपिका पल्लीकलने जेएसडब्ल्यू चॅलेंजर सर्किट स्क्वॉश स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावले. रंगतदार अंतिम सामन्यामध्ये दीपिकाने ४६ मिनिटांमध्ये नोउरन इल टोर्कीचा ३-० (१४-१२, १२-१०, ११-७) असा पराभव करत जेतेपदावर नाव कोरले. पुरुषांमध्ये हरिंदर पाल संधूने इजिप्तच्या सेहाब इसाम होस्नीवर ५० मिनिटांमध्ये ३-० (११-९, ११-७, ११-७) असा विजय मिळवला.
टोर्कीने सामन्यातला पहिला गुण मिळवला, दोघींचीही पहिल्या गेममध्ये ११-११ अशी बरोबरी झाली होती, पण त्यानंतर दीपिकाने अनुभव पणाला लावत पहिला गेम १४-१२ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये दीपिकाला कडवी झुंज मिळाली, पण तिने हा गेम १२-१० असा जिंकला. दोन गेम जिंकल्यावर दीपिकाचे मनोबल कमालीचे उंचावले होते. त्यानंतरचा तिसरा गेम ११-७ असा सहज जिंकत तिने जेतेपदावर नाव कोरले.