आर. अश्विनची सरावाला दांडी
इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत दणकून मार खालेल्या भारतीय क्रिकेट संघाने गुरुवारपासून सुरू होणाऱ्या चौथ्या व अंतिम कसोटीत चांगली कामगिरी करण्यासाठी व्हीसीएच्या जामठा मैदानावर कसून सराव केला. दोन्ही प्रतिस्पर्धी संघ आज सकाळी लवकर मैदानावर दाखल झाले. इंग्लंडच्या खेळाडूंनी आधी बराच वेळ वॉर्मअप करून नंतर फलंदाजीचा सराव केला. कोलकाता कसोटीत विजयी झालेल्या संघातील जेम्स अँडरसन, माँटी पनेसर व स्टीव्हन फिन हे तीन गोलंदाज मात्र यावेळी अनुपस्थित होते. जोरदार फॉर्मात असलेला कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक, केव्हिन पीटरसन, जोनाथन ट्रॉट, इयान बेल यांनी नेट्समध्ये फलंदाजीचा सराव केला. आतापर्यंत भारतीय फिरकीपटूंना निष्प्रभ ठरवणाऱ्या इंग्लिश फलंदाजांनी नेटमध्येही फिरकीपटूंसोबतच सराव केला. या सरावात व्हीसीएचे डावखुरे फिरकी गोलंदाज आणि लेगस्पिनर गोलंदाज सहभागी झाले होते. ऑफ-स्पिनर गोलंदाज ग्रॅमी स्वाननेही गोलंदाजी न करता फलंदाजी करण्यालाच पसंती दिली.यानंतर दुपारच्या सत्रात भारतीय संघातील खेळाडूंनी सराव केला. भारताचा संपूर्ण संघ मैदानात उतरण्यापूर्वी  ईशांत शर्माने गोलंदाजीचे प्रशिक्षक जो डॉस यांच्यासह गोलंदाजीचा सराव केला, तर विराट कोहलीने नेट्समध्ये फलंदाजीचा सराव केला. क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक ट्रेव्हर पेनी यांनी थ्रो व स्कूपच्या साहाय्याने विराटला फलंदाजीची प्रॅक्टिस दिली.दुपारी दोन वाजताच्या सुमारास मैदानावर आलेला भारतीय संघ थेट नेट्समध्ये सरावासाठी गेला. कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यासह वीरेंद्र सेहवाग, चेतेश्वर पुजारा, गौतम गंभीर, मुरली विजय यांनी फलंदाजीचा सराव केला, तर ईशांत शर्मा व प्रग्यान ओझा यांनी गोलंदाजी केली. ऑफ-स्पिनर आर. अश्विन याने सरावात भाग घेतला नाही. त्याचे कुठलेही कारण संघ व्यवस्थापनाने दिले नाही.     

सचिन थेट खेळपट्टीवर
नागपूरच्या सामन्यासाठी खेळपट्टी कशी राहील, हा चर्चेचा विषय झाला असताना भारतीय संघाचे खेळाडू मैदानात दाखल झाल्यावर थेट मागच्या बाजूच्या नेट्समध्ये गेले. सध्या फॉर्मात नसलेल्या मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही सरावाला पसंती दिली. त्याने पॅड चढवून फलंदाजीचा कसून सराव केला. जामठय़ाच्या खेळपट्टीवर सचिन कशी खेळी करणार, याबाबत सर्वानाच उत्सुकता आहे. नागपुरात सामना खेळण्यासाठी आल्यानंतर सचिन नियमितपणे टेकडीच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जातो. त्यानुसार सोमवारी दुपारी नागपुरात आल्यानंतर त्याने सायंकाळी टेकडी मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले.