मार्क कॅल्जोयूवने झुंजवले   गुरुसाईदत्त दुसऱ्या फेरीत

गतविजेत्या अजय जयरामला डच खुल्या ग्रां. प्रि. बॅडमिंटन स्पध्रेच्या पहिल्या फेरीत विजयासाठी संघर्ष करावा लागला. नेदरलँडच्या मार्क कॅल्जोयूवने भारताच्या तिसऱ्या मानांकित जयरामला विजयासाठी झुंजवले. मात्र जयरामने वेळीच खेळ उंचावत १९-२१, २१-१७, २१-१८ असा निसटता विजय साजरा केला. जयरामसह भारताच्या आर. एम. व्ही. गुरुसाईदत्त यानेही दुसऱ्या फेरीत सहज प्रवेश केला.

कोरिया खुल्या सुपर सीरिज बॅडमिंटन स्पध्रेच्या अंतिम फेरीत प्रवेश केल्यामुळे जयरामने जागतिक क्रमवारीत २५व्या स्थानावर झेप घेतली होती. याच कामगिरीचे सातत्य राखण्याच्या निर्धाराने तो येथे दाखल झाला आहे. पुढील फेरीत त्याला जर्मनीच्या फॅबीअन रोथ याचे आव्हान आहे. नवव्या मानांकित गुरुसाईदत्तने बेल्जियमच्या मॅक्सिमे मोरिल्सचा २१-८, २१-९ असा सहज पराभव केला, परंतु आनंद पवारला पहिल्याच फेरीत मलेशियाच्या इस्कंदर जुल्कनैन झैनुद्दीनकडून १०-२१, १५-२१ असा पराभव पत्करावा लागला. गुरुसाईदत्तला पुढील फेरीत चायनीज तैपेईच्या चुन वेई चेनचा सामना करावा लागेल.

पहिल्या गेममध्ये जयरामने ७-० अशी आघाडी घेतली होती. मात्र, मार्कने दमदार खेळ करताना हा गेम १५-१५ असा बरोबरीत आणला. त्यानंतर त्याने सलग सहा गुणांची कमाई करून १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्ये जयरामने पुन्हा आघाडी घेतली आणि मार्कने पुन्हा त्याला ९-९ असे बरोबरीत आणले. यावेळी जयरामने बाजी मारून सामना १-१ असा बरोबरीत आणला. निर्णायक गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी तोडीसतोड खेळ केला. आघाडी आणि बरोबरीच्या शर्यतीत जयरामने २१-१८ अशी बाजी मारून सामना जिंकला.