रिषभ पंतची अर्धशतकी खेळी; दिल्लीचा गुजरातवर आठ विकेट्सने विजय
रिषभ पंतने नेत्रदीपक फटकेबाजी करत अव्वल स्थानावर असलेल्या गुजरात लायन्सच्या गोलंदाजीचा पंचनामा करत दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. रिषभ आणि क्विंटन डी’कॉक यांनी ११५ धावांची दमदार सलामी दिल्यामुळे दिल्लीला गुजरातवर आठ विकेट्स राखून विजय मिळवता आला. या विजयासह दिल्लीने दहा गुणांसह दुसरे स्थान मिळवले आहे, तर पराभवानंतरही गुजरातचे अव्वल स्थान कायम आहे.
दिल्लीने नाणेफक जिंकत गुजरातला फलंदाजीसाठी पाचारण केले आणि दिल्लीचा फिरकीपटू शाहबाज नदीमने गुजरातच्या ड्वेन स्मिथ आणि आरोन फिंच यांचा काटा काढत संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर गुजरातची ३ बाद २४ अशी दयनीय अवस्था केली. पण दिनेश कार्तिकने अर्धशतक झळकावत संघाला सन्मानजक धावसंख्या उभारून दिली. कार्तिकला यावेळी कर्णधार सुरेश रैना (२४) आणि रवींद्र जडेजा यांची उपयुक्त साथ लाभली. एकेकाळी तीन फलंदाज झटपट बाद झाल्यावर गुजरातचा संघ दिडशे धावांचे आव्हान दिल्लीपुढे ठेवतील, असे कुणालाही वाटले नव्हते. पण कार्तिकने संयत फलंदाजी करत पाच चौकारांच्या जोरावर ५३ धावांची खेळी साकारली. कार्तिक बाद झाल्यावर जडेजाने दिल्लीच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत चार चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ३६ धावांची खेळी साकारली.
दिल्लीच्या आव्हानाचा पाठलाग करताना रिषभने आपल्या जोरकस फटक्यांच्या जोरावर गुजरातच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. रैनाच्या नवव्या षटकातील पाचव्या चेंडूवर षटकार ठोकत रिषभने २५ चेंडूंमध्ये अर्धशतक साजरे केले, हा स्पर्धेतील तिनशेवा षटकार ठरला. अर्धशतक झळकावल्यावर रिषभ दिल्लीला विजयावर शिक्कामोर्तब करून देईल, असे वाटत होते. पण जडेजाच्या संथ चेंडूवर तो फसला आणि तंबूत परतला. रिषभने ४० चेंडूंत ९ चौकार आमि दोन षटकारांच्या जोरावर ६९ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. रिषभला यावेळी डी’कॉकची (४५) सुयोग्य साथ लाभली. डी’ कॉकला४१ अर्धशतक झळकावण्याची संधी होती, पण पंत बाद झाल्यावर तो सहा धावांमध्येच बाद झाला. पण बाद होण्यापूर्वी रिषभ आणि डी’कॉक यांनी संघाला विजयासमीप नेऊन ठेवले होते.

संक्षिप्त धावफलक
गुजरात लायन्स : २० षटकांत ७ बाद १४९ (दिनेश कार्तिक ५३, रवींद्र जडेजा नाबाद ३६; शाहबाज नदीम २/२३) पराभूत वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स : १७.२ षटकांत २ बाद १५० (रिषभ पंत ६९, क्विंटन डी’कॉक ४६; रवींद्र जडेजा १/२१)
सामनावीर : रिषभ पंत.