रायझिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्धच्या सामन्यात विजयाचा घास दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या तोंडाशी आला होता. पण अखेरच्या षटकातील बोथट गोलंदाजीमुळे त्यांना हा सामना गमवावा लागला. त्यामुळे गुणतालिकेत तळाला असलेल्या पंजाबविरुद्धच्या सामन्यात दिल्लीला विजयाची आशा असेल. दुसरीकडे पंजाबचा संघ स्पर्धेतून जवळपास बाहेर पडल्याचे चित्र आहे. पण स्पर्धेतून जाता जाता काही संघांना धक्का देण्याचा पंजाबचा प्रयत्न असेल.

राहुल द्रविडचे मार्गदर्शन आणि झहीर खानच्या नेतृत्वाखाली दिल्लीने गेल्या तीन हंगामांपेक्षा चांगली कामगिरी यंदा केली आहे. आतापर्यंत आठ सामन्यांपैकी त्यांनी पाच सामने जिंकले आहेत. दिल्लीचा संघ विजयासाठी कोणत्याही एका खेळाडूवर अवलंबून नाही, ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. कारण संघामध्ये चांगले समन्वय असून सांघिक कामगिरीच्या जोरावर त्यांनी विजय मिळवले आहेत. पण चांगली कामगिरी करणाऱ्या संघातील काही खेळाडूंना का खेळवले जात नाही, हे अनाकलनीय आहे. संजू सॅमसन आणि करुण नायर संघाला चांगली सुरुवात करून देत आहे. कालरेस ब्रेथवेट आणि ख्रिस मॉरिस हे चांगली अष्टपैलू कामगिरी करत आहेत. पण संघातील सर्वात महागडा खेळाडू असलेल्या पवन नेगीला अजूनही सूर गवसलेला नाही. सहा सामन्यांमध्ये त्याने फक्त ५१ धावा केल्या असून गोलंदाजीमध्ये सहा षटकांत ६५ धावा देत एकही बळी मिळवलेला नाही. दिल्लीचा संघ सध्याच्या घडीला झहीर खानच्या पुनरागमनाच्या प्रतीक्षेत आहे. त्याच्या पुनरागमनाने संघाचे मनोबल कमालीचे उंचावण्यासाठी मदत होईल.

पंजाबच्या संघाने डेव्हिड मिलरच्याऐवजी मुरली विजयकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली असली तरी संघाच्या कामगिरीत मोठा बदल झालेला नाही. विजयला फलंदाजीमध्ये छाप पाडता आलेली नाही. त्याचबरोबर मनन व्होरालाही सूर गवसलेला नाही. गोलंदाजीमध्ये संदीप सिंग आणि अक्षर पटेल चांगली कामगिरी करीत आहे.

कागदावर पाहिल्यास पंजाबपेक्षा दिल्लीचे पारडे अधिक जड आहे. त्याचबरोबर दिल्लीच्या संघाचा फॉर्मही चांगला आहे. त्यामुळे जर दिल्लीचा संघ गाफील न राहता खेळला तर त्यांना विजय मिळवणे अवघड नसेल.