दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब हे दोन्ही आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील झगडणारे संघ. बाद फेरीचे स्वप्न साकारण्यासाठी विजयाच्या वाटेवर परतण्याच्या ईष्रेनेच हे संघ रविवारी होणाऱ्या सामन्याकडे पाहत आहेत.

पंजाबने ८ सामन्यांत फक्त ३ विजय मिळवले असून, ते आयपीएल गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहेत, तर ७ सामन्यांत २ विजय मिळवू शकणारा दिल्लीचा संघ तळाच्या स्थानावर आहे. त्यामुळे हा सामना गमावल्यास दिल्लीचे बाद फेरीचे आव्हान जवळपास संपुष्टात येऊ शकेल. त्या तुलनेत पंजाबची स्थिती बरी असल्यामुळे हा पराभव त्यांचा मार्ग अधिक खडतर करू शकतो. पंजाबने मागील सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून पराभव पत्करला आहे, तर दिल्लीने कोलकाता नाइट रायडर्सकडून हार स्वीकारली आहे.

पंजाबच्या संघाला फॉर्मात असलेल्या हशिम अमलाची उणीव तीव्रतेने भासणार आहे. कारण मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे तो खेळू शकणार नाही. मात्र हैदराबादविरुद्ध ८४ धावांची खेळी करणाऱ्या शॉन मार्शवर त्यांची प्रमुख मदार असेल. त्यामुळे आव्हान टिकवण्यासाठी पंजाबला अष्टपैलू खेळाची चुणूक दाखवावी लागणार आहे. हैदराबादविरुद्ध भोपळा फोडू न शकणारा कर्णधार ग्लेन मॅक्सवेलकडून पंजाबच्या क्रिकेटरसिकांना मोठय़ा खेळीची अपेक्षा आहे. पंजाबचा भरवशाचा गोलंदाज इशांत शर्माला मागील सामन्यात एकही बळी मिळाला नव्हता, याशिवाय तो महागात ठरला होता. दिल्लीविरुद्ध तो प्रभाव पाडेल, अशी आशा आहे. एकंदर पंजाबचा संघ आयपीएलमध्ये असातत्यपूर्ण कामगिरीसाठी आता ओळखला जाऊ लागला आहे.

दुसरीकडे दिल्लीच्या संघाने कोलकाताविरुद्धच्या सामन्यात ६ बाद १६० अशी धावसंख्या रचली होती. या सामन्यात किमान १८० धावांचे लक्ष्य उभारता आले असते. सलामीवीर संजू सॅमसनने ३८ चेंडूंत ६० धावा केल्या, तर श्रेयस अय्यरने ३४ चेंडूंत ४७ धावा काढल्या. मात्र त्यानंतर दिल्लीच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी हाराकिरी पत्करल्यामुळे धावसंख्या सीमित राहिली. याआधीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्धही दिल्लीचा डाव कोसळला होता. मुंबईचे १४३ धावसंख्येचे आव्हान पेलताना दिल्लीला २० षटकांत जेमतेम ७ बाद १२८ धावा करता आल्या होत्या. त्यामुळे दिल्लीच्या फलंदाजांना खेळ उंचावावा लागणार आहे. सॅमसनने सुरुवातीच्या सामन्यात शतक झळकावले आहे, तर ऋषभ पंतनेही आपले योगदान दिले आहे. परंतु पंजाबविरुद्ध ही सारी सांघिक ताकद यशस्वीपणे उतरण्याची आवश्यकता आहे.गोलंदाजीत कर्णधार झहीर खानला कोरी अँडरसन, पॅट कमिन्स आणि ख्रिस मॉरिस यांचे साहाय्य मिळू शकेल. याचप्रमाणे फिरकी गोलंदाज अमित मिश्रावर त्यांची मदार आहे.

  • सामन्याची वेळ : दुपारी ४ वा.
  • थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी ईएसपीएन.