24 May 2016

दिल्ली जिंकायचीय!

आयुष्यात एकच गोष्ट कायम पाहायला मिळते आणि ती म्हणजे बदल. महेंद्रसिंग धोनीच्या मागे यश

प्रसाद लाड, नवी दिल्ली | January 5, 2013 2:32 AM

आयुष्यात एकच गोष्ट कायम पाहायला मिळते आणि ती म्हणजे बदल. महेंद्रसिंग धोनीच्या मागे यश हात धुवून लागतं, असं काही दिवसांपूर्वी म्हटलं जायचं. कारण प्रतिस्पर्धी कोणीही असो, सामना कोणताही असो, विजय धोनीकडे आपसूकच यायचा. पण चक्र हे नेहमीच बदलत असतं, मग ते ऋतूंचे असो किंवा नशिबाचे. ज्या नशिबाच्या जोरावर धोनीने दोन विश्वचषक भारताला जिंकून दिले, त्याच नशिबाने त्याची सध्या थट्टा मांडली आहे. इंग्लंडपाठोपाठ पाकिस्ताननेही भारतीय संघाची लक्तरे त्यांच्याच वेशीवर टांगली आहेत. इंग्लंडविरुद्धचा पराभव कसातरी पचवता आला, पण पाकिस्तानविरुद्धचा पराभव मात्र जिव्हारी लागला आहे. दोन्ही सामन्यांत पाकिस्तानने भारतीय संघाचे वस्त्रहरण केले. धोनी दोन्ही सामन्यांत लढला खरा, पण त्याचा मधला ‘मिडास टच’ लुप्त पावल्याचे कोलकात्यातील सामन्याने पक्के केले. आता मालिका गमावली असली तरी दिल्ली जिंकायला भारतीय संघ आसुसलेला असेल. या विजयाने शेवट तरी भारताला गोड करता येईल. पण यापूर्वी फिरोझशाह कोटला स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्ध झालेल्या एकमेव सामन्यात पाकिस्तानने भारताला लोटांगण घालायला लावले होते. त्यामुळे त्या पराभवाचा वचपा काढायचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. हा सामना जिंकून उरलीसुरलेली लाज वाचवा, एवढेच भारतवासीय संघाला सांगत आहेत.
१५ सप्टेंबर १९८२ साली कोटलावर पहिला सामना झाला आणि भारताने श्रीलंकेला सहज पराभूत केले. आतापर्यंत भारतीय संघाने कोटलावर १७ सामने खेळले आहेत, ज्यापैकी १० सामने जिंकले असून ५ सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. तर एका सामन्याचा निकाल लागू शकला नाही आणि एक सामना रद्दड खेळपट्टीमुळे रद्द करावा लागला. कोटलावर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आतापर्यंत फक्त एकच लढत झाली असून पाकिस्तानने या सामन्यात भारताला तब्बल १५९ धावांनी पराभूत केले होते. कोटलाची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांपेक्षा फिरकी गोलंदाजांना जास्त मदत करणारी असल्याचे दिसून आले आहे.
२००५मध्ये कानपूरच्या ग्रीन पार्कवर सहा सामन्यांची मालिका पाकिस्तानने
३-२ अशी जिंकली होती, फक्त औपचारिक सहावा सामना कोटलावर खेळवण्यात आला होता. या वेळी मालिकेतील सामन्यांची संख्या कमी झाली असली तरी परिस्थिती अगदी तशीच आहे. आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवत पाकिस्तानने २-० अशी आघाडी घेतली आहे.
या मैदानावर झालेल्या गेल्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत फलंदाजी स्वीकारली आणि शाहीद आफ्रिदीने भारतीय गोलंदाजीच्या चिंधडय़ा उडवल्या होत्या. फक्त २३ चेंडूंत त्याने ६ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४४ धावांची धडाकेबाज खेळी साकारली होती. चांगली सुरुवात झाल्यावर पाकिस्तानच्या मधल्या फळीने याचा चांगलाच फायदा उचलला. शोएब मलिक (७२), युसूफ योहाना (५०), इंझमाम-उल-हक (६८) आणि युनूस खान (४०) यांनी भारताच्या गोलंदाजीच्या तोफा शांत केल्या. आशीष नेहराला तीन बळी मिळवण्यासाठी तब्बल ७२ धावा मोजाव्या लागल्या होत्या. तर आगरकरने ५८ धावांत ३ बळी टिपले होते. ५० षटकांत ८ बळी गमावत ३०३ धावांचा डोंगर उभारला आणि हा डोंगर अर्धाही न चढताच भारतीय संघाला धाप लागली. त्यांचा श्वास १४४ धावांवर थांबला. भारतातर्फे या वेळी सर्वाधिक धावा केल्या होत्या त्या धोनीने आणि त्या होत्या २४. यावरूनच भारताची या सामन्यात काय अवस्था झाली असेल याचा अंदाज येऊ शकतो. फिरकीपटू अर्शद खानने या वेळी ३३ धावांत तीन बळी मिळवले होते, तर आफ्रिदीने अवघ्या १० धावांत २ बळी मिळवले होते.
२००५ साली जी परिस्थिती होती, तीच आता कोटलावर पुन्हा आहे. पाकिस्तानने मालिका जिंकली आहेच, हा सामना फक्त औपचारिकच असेल. पण गेल्या वेळी जो निकाल होता, तो निकाल भारतीय संघ नक्कीच बदलू शकतो. कोटलावर भारतवासीयांना प्रतीक्षा आहे पाकिस्तानच्या पराभवाची, पाकिस्तानने मालिका जिंकली असली तरी त्यांना दिल्ली जिंकायला देऊ नका, अशीच भावना भारतीयांच्या मनात असेल.

First Published on January 5, 2013 2:32 am

Web Title: delhi one day have to win