दिल्ली खुली स्पर्धा जिंकल्यामुळे भारताच्या सोमदेव देववर्मनने जागतिक टेनिस क्रमवारीत ७८ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. मात्र त्याचा सहकारी युकी भांबरीची घसरण झाली आहे. सोमदेवने  दिल्लीतील विजेतेपदाबरोबरच १०० मानांकन गुणांची कमाई केली. त्याने अंतिम लढतीत अग्रमानांकित अ‍ॅलेक्झांडर नेदोयेसोव्ह याच्यावर मात केली होती. सोमदेव दुबई खुल्या स्पर्धेत सहभागी झाला असून तेथे पहिल्याच फेरीत त्याच्यापुढे २००९ चा अमेरिकन विजेता खेळाडू जुआन मार्टिन डेलपोत्रो याचे आव्हान असणार आहे. सोमदेवने २०११ मध्ये जागतिक क्रमवारीत ६२ व्या स्थानावर झेप घेतली होती. त्याची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. युकी भांबरीची १४३ वरून १४६ व्या क्रमांकांपर्यंत घसरण झाली आहे. त्याला दिल्ली खुल्या स्पर्धेच्या पहिल्या फेरीतच पराभवाचा धक्का बसला होता.
दुहेरीत लिअँडर पेसने दहावे स्थान राखले आहे. रोहन बोपण्णा हा १६ व्या क्रमांकापर्यंत घसरला आहे. महेश भूपती हा ४१ व्या क्रमांकावर आहे. त्याने यंदा निवृत्त होण्याचे संकेत दिले आहेत. दिविज शरण हा ६५ व्या क्रमांकावर आहे. महिलांमध्ये सानिया मिर्झाने पहिल्या दहा क्रमांकांमधील आपले स्थान गमावले आहे. ती सध्या ११ व्या स्थानावर आहे. तिला दुबई खुल्या स्पर्धेत कारा ब्लॅकच्या साथीत पहिल्या फेरीतच हार मानावी लागली  होती.