दिनेश कार्तिकने रचलेल्या पायावर तुफानी खेळीने कळस चढवत जेपी डय़ुमिनीने दिल्ली डेअरडेव्हिल्सला कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध ४ विकेट्सनी शानदार विजय मिळवून दिला. कोलकाताने दिलेल्या १६७ धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या डावाला भक्कम आधार दिला तो कार्तिक आणि डय़ुमिनी जोडीने. या जोडीने चौथ्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी करत विजयाचा पाया रचला. ५६ धावांची खेळी करून कार्तिक बाद झाला. यानंतर डय़ुमिनीने सामन्याची सूत्रे हाती घेतली. त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळू शकली नाही. शेवटच्या षटकात ४ चेंडूत ६ धावा हव्या असताना डय़ुमिनीने षटकार खेचत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. डय़ुमिनीने ३५ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ५२ धावांची खेळी केली.
    तत्पूर्वी कोलकाताची सुरुवात अत्यंत चांगली झाली नाही. कॅलिस, गंभीर भोपळाही न फोडता बाद झाल्याने २ बाद ११ अशा स्थितीत सापडलेल्या कोलकाताला रॉबिन उथप्पा आणि मनीष पांडे यांनी सावरले. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी करत कोलकात्यासाठी मोठय़ा धावसंख्येचा पाया रचला. अर्धशतकाकडे कूच करणारा मनीष पांडे ४८ धावा करून बाद झाला. मनीष बाद झाल्यावर उथप्पाला शकीब उल हसनची साथ मिळाली. या जोडीने चौथ्या विकेटसाठी ५७ धावा जोडल्या. ४१ चेंडूंत ६ चौकार आणि एका षटकारासह ५५ धावा करून उथप्पा बाद झाला. यानंतर शकीबने २२ चेंडूंत ३० तर युसुफ पठाणने ८ चेंडूत ११ धावा केल्याने कोलकात्याने दीडशेचा टप्पा ओलांडला. दिल्लीतर्फे नॅथन कोल्टिअर नीलने सर्वाधिक २ बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
 कोलकाता नाइट रायडर्स  : २० षटकांत ५ बाद १६६ (रॉबिन उथप्पा ५५, मनीष पांडे ४८, शकीब उल हसन ३०, नॅथन कोल्टिअर नील २/२७) पराभूत विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स : १९.३ षटकांत ६ बाद १६७ (दिनेश कार्तिक ५६, जेपी डय़ुमिनी ५२, मॉर्ने मॉर्केल २/४१).