जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या नोवाक जोकोविकला ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत पराभवाचा धक्का बसला आहे. जोकोविकला स्पर्धेच्या दुसऱ्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला आहे. जागतिक्र क्रमवारीत ११७ व्या स्थानावर असणाऱ्या उझेबिकेस्तानच्या डेनिस इस्टोमिनने तब्बल पाच तास चाललेल्या संघर्षपूर्ण लढतीत नोवोक जोकोविकला पराभवाचा धक्का दिला आहे.

डेनिस इस्टोमिनने मेलबर्न रॉड लेव्हर अरेनावरील लढतीत नोवाक जोकोविकचा ७-६(८), ५-७, २-६, ७-६(५), ६-४ असा पराभव केला. तब्बल सहावेळा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावलेल्या नोवाक जोकोविकने डेनिस इस्टोमिनला कडवी लढत दिली. मात्र इस्टोमिनने जोकोविकचा संघर्ष मोडीत काढला. तब्बल १२ ग्रँडस्लॅम विजेतेपद नावावर असलेला जोकोविक आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या शंभर जणांमध्येही नसलेल्या इस्टोमिनमधील सामना चांगलाच रंगला. माजी विजेता जोकोविकने तब्बल ४ तास ५० मिनिटे संघर्ष केला. मात्र इस्टोमिन जोकोविकला पुरुन उरला. त्यामुळे जोकोविकचे स्पर्धेतील आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आले.

‘मला नोवाकबद्दल वाईट वाटते. पण मी आज खूप चांगला खेळलो,’ असे इस्टोमिनने या सामन्यानंतर म्हटले. ‘माझ्या आजच्या खेळामुळे मलादेखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. मला माझ्या संघाचे आभार मानायचे आहेत. त्यांनी खूप चांगली कामगिरी केली. माझ्या मनात असंख्या भावना दाटून आल्या आहेत. इथे येऊन मला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानतो,’ असे इस्टोमिनने या सामन्यानंतर बोलताना म्हटले.