डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल आणि एच. एस. प्रणॉयला गाशा गुंडाळावा लागला. तर के. श्रीकांतने सेमी फायनलमध्ये धडक देत भारताचे आव्हान कायम ठेवले आहे.

शुक्रवारी श्रीकांतने उपांत्यपूर्व फेरीत वर्ल्ड चॅम्पियन व्हिक्टर अॅक्सेलसन याचा १४-२१, २२-२० आणि २१-७ ने पराभव केला. गेल्या आठ सामन्यांच्या तुलनेत या सामन्यात श्रीकांतला चिवट झुंज द्यावी लागली. पहिल्या सेटमध्ये पराभव पत्करल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये श्रीकांतने २२-२० अशा फरकाने यश मिळवत सामन्यात पुनरागमन केलं. तिसऱ्या सेटमध्येही या सामन्याची रंगत पाहायला मिळणार अशी अनेकांची अपेक्षा होती. पण, श्रीकांतच्या आक्रमक खेळीमुळे अॅक्सेलसनचा पराभव झाला. तिसऱ्या सेटमध्ये अॅक्सेलसनवर २१-७ अशी मात करत सामना खिशात टाकला. जवळपास ५५ मिनिटे चाललेला हा सामना जिंकत श्रीकांतने उपांत्य फेरीत धडक मारली.

वाचा : सचिनच्या मुलांचं बोगस अकाऊंट ट्विटरने हटवले, सचिनच्या नाराजीनंतर तात्काळ कारवाई

दुसरीकडे सायना नेहवाल आणि प्रणॉयच्या वाट्याला मात्र अपयश आलं. मागच्या वर्षीची विजेती खेळाडू अकेन यामागुचीसमोर ‘फुलराणी’ सायनाची जादू चालू शकली नाही. यामागुची ही जपानची खेळाडू आहे. सायनाने हा सामना १०-२१, १३-२१ या फरकाने गमावला असून, अवघ्या २९ मिनिटांत तिची ही झुंज संपुष्टात आली. सायनाच्या या पराभवापूर्वी पी.व्ही.सिंधूसुद्धा पहिल्याच फेरीत या स्पर्धेतून बाद झाली होती. दक्षिण कोरियाच्या सोन वान-हू या खेळाडूसमोर भारतीय बॅडमिंटनपटू प्रणॉयही फार काळ तग धरु शकला नाही.