मणिपूरमध्ये सुतारकाम करणाऱ्याचा मुलगा असेल किंवा बेंगळूरुच्या पथारीवरील विक्रेत्यांच्या मुलाने कधीतरी विश्वचषक फुटबॉल क्षेत्रात देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहिले असेल. हे स्वप्न लवकरच साकार होणार आहे, यावर या मुलांचा विश्वासच बसत नाही. मात्र अशी उपेक्षितांची मुले कुमारांच्या (१७ वर्षांखालील) विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत तिरंगा फडकवण्यासाठी उत्सुक आहेत.

घरच्या मैदानावर प्रथमच होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारताच्या २१ खेळाडूंचा संघ जाहीर झाला आहे. या संघात स्थान मिळवण्यासाठी या खेळाडूंबरोबरच त्यांच्या पालकांनाही भरपूर संघर्ष करावा लागला आहे. एक वेळ आपली उपासमार झाली तरी चालेल, मात्र मुलांची हौस फिटली पाहिजे, याच हेतूने त्यांनी मुलांसाठी सर्वस्व पणाला लावले. आपले अपुरे राहिलेले स्वप्न मुलांद्वारे पूर्ण करण्यासाठी त्यांचीही उत्कंठा निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाची (फिफा) प्रथमच एवढी मोठी स्पर्धा भारतीय भूमीवर ६ ते २८ ऑक्टोबरदरम्यान होत आहे.

अमरजितसिंग कियाम

मणिूपरच्या अमरजितसिंग कियाम हा देखील कोमलप्रमाणेच गरीब कुटुंबात जन्म झालेला खेळाडू आहे. त्याचे वडील चंद्रमणीसिंग हे थौबल या खेडेगावात सुतारकाम करतात. त्याची आई आशांगबी देवी ही दररोज २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या इम्फाळ येथील बाजारात जाऊन मासे विकते. कियाम म्हणाला, ‘‘माझे वडील शेतीच्या हंगामात शेतावर काम करतात व उरलेल्या वेळेत सुतारकाम करतात. मात्र त्यांनी मला कधीही त्यांच्या कामात मदत करण्याचा आग्रह धरला नाही. त्यांनी मला फुटबॉलसाठी सतत प्रोत्साहन दिले आहे.’’

कियामचा मोठा भाऊ उमाकांत सिंग हा देखील फुटबॉल खेळतो. २०१० मध्ये कियामने चंडिगढ येथे आपल्या भावाच्या अकादमीत नाव नोंदवले. या अकादमीत आल्यानंतर या दोन्ही खेळाडूंची मोफत निवास व भोजन व्यवस्था झाल्यामुळे त्यांच्या पालकांवरील ओझे कमी झाले. तसेच कियामच्या शिक्षणाचीही तेथे व्यवस्था झाल्यामुळे त्याच्या शिक्षणाचाही प्रश्न आपोआप सुटला. २०१५ मध्ये चंडिगढ अकादमीचा संघ गोव्याच्या दौऱ्यावर आला असताना त्याच्याकडील कौशल्य अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या नजरेतून सुटले नाही. महासंघाच्या तेथील अकादमीत त्याला प्रशिक्षणाची संधी मिळाली. तेव्हापासून तो तिथेच सराव करीत आहे.

संजीव स्टॅलिन

संजीव स्टॅलिनची आई परमेश्वरी ही बेंगळूरुयेथे पदपथावर कपडे विकण्याचा व्यवसाय करते. संजीवचे खेळातील कौशल्य पाहिल्यानंतर त्याच्या इच्छेखातर परमेश्वरी यांनी थोडेफार पैसे जमा केले व त्याला चंडिगढ अकादमीत प्रशिक्षणासाठी पाठवले. तेथे सात वर्षे त्याने सराव केला. त्यानंतर त्याची राष्ट्रीय शिबिरासाठी निवड झाली. आतापर्यंतच्या वाटचालीबाबत संजीव म्हणाला, ‘‘लहानपणापासून मला पालकांकडून सहकार्य मिळाले आहे. माझ्या बुटांकरिता व अन्य पोशाखाकरिता ते पैसे कसे उभे करीत होते हे मला कळत नसे. अर्थात त्यामधून त्यांना दररोज किती मिळतात त्याबाबत कधी माहिती दिली नाही. आपल्याकरिता रस्त्यावर उभे राहून ते कपडे विकतात एवढेच मला माहिती आहे.’’

कोमल थाटल

सिक्कीम येथील १७ वर्षीय कोमल थाटलकडे फुटबॉल विकत घेण्याची ऐपत नव्हती. कापडाच्या चिंध्यांपासून केलेल्या फुटबॉलसोबत तो सराव करीत असे. त्या दिवसांबाबत कोमल म्हणाला, ‘‘माझे पालक शिवणकाम करतात. त्यांच्या कामातून उरलेल्या चिंध्यापासून किंवा प्लास्टिकच्या पिशव्यांपासून केलेल्या चेंडूचा उपयोग मी लहानपणी खेळण्यासाठी करीत असे. माझे या खेळातील कौशल्य पाहून त्यांनी काटकसर करीत मला बूट व चेंडू घेण्यासाठी पैसे दिले. त्यांच्या त्यागामुळेच मी भारतीय संघात स्थान मिळवण्यापर्यंत पोहोचलो आहे. माझ्या अनेक मित्रांनीही मला मदत केली आहे.’’

पश्चिम सिक्कीममधील शालेय स्पर्धामध्ये कोमलने चमक दाखवल्यानंतर त्याच्या पालकांनी २०११ मध्ये त्याला नामची स्पोर्ट्स अकादमीत घातले. २०१४ मध्ये गोव्यात झालेल्या राष्ट्रीय संघ निवड चाचणीत त्याला भाग घेण्याची संधी मिळाली. तेथे त्याची भारताच्या संभाव्य संघात निवड झाल्यानंतर तो या शिबिरातच आहे. गतवर्षी गोव्यातच झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याने भारताकडून खेळताना ब्राझील संघाविरुद्ध गोल नोंदवला. या सामन्यात भारताने १-३ असा पराभव स्वीकारला, मात्र कोमलच्या खेळाने सर्वानाच थक्क केले.

खुमांथेम निंगथोईंग

भारताच्या मधल्या फळीतील खेळाडू खुमांथेम निंगथोईंगबाचीही आई उपजीविकेसाठी इम्फाळ येथे रस्त्यावर मासे विकते. कोलकाता येथील खेळाडू जितेंद्र सिंगचे वडील सुरक्षारक्षक म्हणून काम करतात तर आई शिवणकाम करते.