जे झालं, ते चांगलं असो किंवा वाईट, उगाळत बसलं तर वर्तमानात हाती काहीच लागत नाही. गेलं वर्ष भारतासाठी क्लेशदायकंच गेलं होतं, परदेशात पराभूत झालो याचं दु:ख आहेच, पण त्याहीपेक्षा मायदेशात इंग्लंडने ज्यापद्धतीने पराभूत केलं ते नक्कीच जिव्हारी लागणारं होतं. पण ते वर्ष सरलं. त्या चुकांमधून भारतीय संघ बरेच काही शिकला असेल, अशी आशा करू या आणि नवीन वर्षांतील पहिल्याच कसोटीत त्याचे चांगले परिणाम दिसतील अशी अपेक्षा भारतीय संघाकडून करायला हरकत नाही. ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात दाखल झालाय तो वेगवान गोलंदाजांचा ताफा घेऊन. एकीकडे भारताचे फलंदाज आणि ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज आणि भारताचे फिरकीपटू असे युद्ध रंगणार आहे. भारतीय संघाचा सध्याचा फॉर्म चांगला नसला तरी नव्या प्रतिस्पध्र्याचा सामना करायला ते आपल्या मैदानात सज्ज असतील. दुसरीकडे विजयाचा ध्वज भारतातही उंचावण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ आतुर असेल.
भारतीय संघापुढे सध्या दोन पेच आहेत आणि ते म्हणजे सलामीवीर व फिरकीपटूंचे. वीरेंद्र सेगवागची जागा नक्की असली तरी त्याला सलामीला साथ मुरली विजय देणार की शिखर धवन, हा पहिला प्रश्न सोडवावा लागेल. सध्याचा फॉर्म आणि अनुभव यांचा विचार करता मुरलीला संधी मिळण्याची जास्त शक्यता आहे. त्यानंतर चेतेश्वर पुजारा, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांची स्थाने पक्की आहेत. सचिनसाठी हे मैदान ‘लकी’ ठरले आहे, त्यामुळे या आवडत्या स्टेडियमवर सचिनच्या धावांचा दुष्काळ संपतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. चेपॉक स्टेडियम हे फिरकीसाठी ओळखले जाते, त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ प्रग्यान ओझा, आर. अश्विन, हरभजन सिंग यांच्यासह उतरण्याची शक्यता आहे. एक वेगवान गोलंदाज आणि तीन फिरकीपटू असे गोलंदाजीचे समीकरण असेल. या फिरकीपटूंना अष्टपैलू रवींद्र जडेजाची साथ लाभेल. कर्णधार महेंद्रसिंग धोनी चांगल्या फॉर्मात असून त्याच्याकडून दमदार फलंदाजीची अपेक्षा असेल. एकमेव वेगवान गोलंदाज खेळवायचा झाला तर इशांत शर्मालाच पसंती देण्यात येईल.
पीटर सिडल, जेम्स पॅटीन्सन आणि मिचेल स्टार्क या वेगवान त्रिकुटासह ऑस्ट्रेलियाचा संघ या सामन्यात उतरेल. या तिघांचीही शैली भिन्न असल्याचा फायदा ऑस्ट्रेलियाचा होऊ शकतो. नॅथन लिऑन हा एकमेव फिरकीपटू संघात असल्याने त्याच्यावर मोठी जबाबदारी असेल. दुखापतीतून सावरलेला डेव्हिड वॉर्नर कशी कामगिरी करतो, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.
सराव सामन्यांमध्ये शेन वॉटसन आणि इडी कोवन यांनी चांगली कामगिरी केली होती, त्यामुळे त्यांच्याकडून कामगिरीत सातत्य राखण्याची अपेक्षा असेल. कर्णधार मायकेल क्लार्क सध्या भन्नाट फॉर्मात आहे, त्याचा हा फॉर्म भारतातही कायम राहतो का, हे पाहावे लागेल.
ऑस्ट्रेलियाचा संघ अनुनभवी समजला जात असला तरी त्यांचे मनोबल गेल्या काही विजयांमुळे कमालीचे उंचावलेले आहे. तर दुसरीकडे भारताचे मनोबल ऑस्ट्रेलियाएवढे चांगले नसले तरी त्यांच्याकडे असलेला अनुभव विजयाचे माप त्यांच्या पदरात टाकू शकतो.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, हरभजन सिंग, प्रग्यान ओझा, इशांत शर्मा, अशोक दिंडा आणि भुवनेश्वर कुमार.
ऑस्ट्रेलिया : मायकेल क्लार्क (कर्णधार), इडी कोवन, डेव्हिड वॉर्नर, फिलीप ह्य़ुजेस, शेन वॉटसन, मोइसेस हेन्रीक्स, मॅथ्यू व्ॉड (यष्टीरक्षक), नॅथन लिऑन, पीटर सिडल, मिचेल स्टार्क, जेम्स पॅटीन्सन आणि ग्लेन मॅक्सवेल (१२ वा खेळाडू)
सामन्याची वेळ सकाळी ९.३० पासून.

हरभजनचा सामना करणे कठीण – क्लार्क
चेन्नई : भारताच्या फिरकीला घाबरत नाही, असे  म्हणत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क याने आपल्याच वक्तव्याला छेद देत फिरकीपटू हरभजन सिंगचा सामना करणे कठीण असल्याचे म्हटले आहे. शंभरावा कसोटी सामना खेळण्यास सज्ज असणाऱ्या हरभजनचे अभिनंदन करायलाही तो विसरला नाही. ‘पहिल्यांदा हरभजनचे ऑस्ट्रेलिया संघाकडून मी अभिनंदन करतो. भारतीय गोलंदाजांपैकी हरभजनचा सामना करणे कठीण आहे, पण त्याचा सामना कसा करायचा याची रणनीती आम्ही आखलेली आहे,’ असे क्लार्क म्हणाला.

कसोटींच्या शतकपूर्तीसाठी हरभजन सज्ज
सध्या त्याचा फॉर्म हरवला आहे, स्थानिक सामन्यांमध्येही त्याच्याकडून चांगली कामगिरी झालेली नाही, पण तरीही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळून कसोटींच्या शतकपूर्तीसाठी भारताचा ऑफ स्पिनर हरभजन सिंग सज्ज झालेला आहे. शंभराव्या सामन्यात खेळण्यासाठी हरभजन सज्ज असला तरी त्याच्या मनात या सामन्याबद्दल थोडीशी भीती मात्र नक्कीच आहे. हरभजनने ९९ कसोटी सामन्यांमध्ये ३२.२७ च्या सरासरीने ४०४ बळी मिळवले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना खेळल्यास हरभजन शंभरावी कसोटी खेळणारा भारताचा दहावा फलंदाज ठरेल. माझ्यासाठी शंभरावा सामना फार महत्त्वाचा आहे. माझ्यासाठी ही फार मोठी गोष्ट असून माझ्या मनात सामन्याबद्दल थोडीशी भीतीदेखील आहे. पण सामन्याच्या वेळी सारे काही ठीक होईल, याचा मला विश्वास आहे. शंभरावी कसोटी पूर्ण केल्यावर यापुढे अजून ५० कसोटी सामने खेळण्याचा माझा मानस आहे, असे हरभजनने सामन्यापूर्वी सांगितले.