हॉकी इंडिया लीगमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना पुन्हा संधी द्यावी, त्यामुळे स्पर्धेतील सामने अधिक रंगतदार होतील, असे मत भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार धनराज पिल्लेने व्यक्त केले.
हॉकी लीगमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंच्या सहभागासाठी हॉकी संघटकांनी केंद्र शासनाकडून परवानगी घ्यावी असे सांगून धनराज म्हणाला की, ‘‘पूर्वी या स्पर्धेत पाकिस्तानचे खेळाडू खेळत असताना सामन्यांना प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असे. या स्पर्धेत त्यांच्या सहभागाबाबत अडचण येणार नाही अशी मला आशा आहे. भारतामधील चॅम्पियन्स स्पर्धेत पाकिस्तानच्या खेळाडूंनी भारतावर विजय मिळविल्यानंतर आनंद व्यक्त करताना बेशिस्त वर्तन केले होते तसेच या बेशिस्त वर्तनाबद्दल माफी मागण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे त्यांच्या खेळाडूंना हॉकी लीगमध्ये सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत दोन्ही देशांच्या संघटकांनी सामोपचाराने हा प्रश्न सोडविला पाहिजे.’’
‘‘लीगद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नापैकी काही रक्कम हॉकी अकादमी स्थापन करण्यासाठी व खेळाचा दर्जा उंचावण्यासाठी करण्याची आवश्यकता आहे. हॉकी इंडियाने उच्च कामगिरी संचालक म्हणून रोलँट ओल्टमन्स म्हणून नियुक्त केले आहे. मात्र स्थिरावलेल्या खेळाडूंच्या प्रशिक्षणावरच ते भर देत आहेत. आता त्यांच्याकडे भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे खेळाच्या प्रसाराकरिता ते अपेक्षेइतके वेळ देऊ शकत नाहीत. तळागाळापर्यंत या खेळाचा प्रसार व प्रचार होण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता हॉकी लीगच्या संघटकांनी उत्पन्नाचा काही भाग त्याकरिता खर्च केला पाहिजे,’’ असेही धनराजने सांगितले.
परदेशी प्रशिक्षकांबाबत धनराज म्हणाला की, ‘‘भारतीय संघास परदेशी प्रशिक्षकाची आवश्यकता नाही. कोणतेही परदेशी प्रशिक्षक नसताना मेजर ध्यानचंद, दलजितसिंग धिल्लाँ, जुगराजसिंग यांच्यासह अनेक जागतिक दर्जाचे खेळाडू येथे घडले आहेत. कोणताही परदेशी प्रशिक्षक नसतानाही माझीही कारकीर्द घडली. जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देण्याची क्षमता भारताच्या अनेक प्रशिक्षकांकडे आहे. परदेशी प्रशिक्षक कधीही शंभर टक्के ज्ञान देत नाहीत. काही ज्ञान ते आपल्याकडेच राखून ठेवतात. अनेक भारतीय खेळाडूंना इंग्रजी भाषा अवगत नसते, अशा वेळी परदेशी प्रशिक्षकांबरोबर हे खेळाडू चांगला सुसंवाद ठेवू शकत नाहीत.’’
हॉकी लीगमध्ये एखादी फ्रँचाईजी खरेदी करणे हे माझ्या आवाक्यात नाही, मात्र पुणे किंवा मुंबईत वीस लाख रुपयांची गुंतवणूक करीत स्थानिक स्तरावरील लीग स्पर्धा आयोजित करण्यास मला आवडेल, असेही धनराज म्हणाला.