मनोज तिवारी, सुदीप चॅटर्जी यांची शतकी खेळी; धवल कुलकर्णीचे ४ बळी

कर्णधार मनोज तिवारी आणि सुदीप चॅटजी यांच्या शतकांच्या बळावर बंगालने मुंबईविरुद्धच्या ४३३ धावांचा डोंगर उभारला. तिसऱ्या दिवसअखेर बंगालकडे ३०३ धावांची मजबूत आघाडी आहे. सामन्याचा एक दिवस बाकी असून मुंबईला विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.

३ बाद १९३ वरून पुढे खेळणाऱ्या बंगालने पहिल्या डावातील सर्व चुका टाळत खेळ केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असलेला मनोज तिवारी आणि प्रथम श्रेणी क्रिकेटचा प्रचंड अनुभव असलेला सुदीप चॅटर्जी यांनी एकेरी, दुहेरी धावांबरोबर चौकारांची सुरेख सांगड घालत मुंबईच्या गोलंदाजांना निष्प्रभ केले. या जोडीने चौथ्या विकेटसाठी २७१ धावांची भागीदारी करत सामन्याचे चित्रच पालटवले. पहिल्या डावात बंगालचा ९९ धावांत खुर्दा उडाला होता. मुंबईने २२९ धावांची मजल मारत या सामन्यावर मजबूत पकड मिळवली होती. मात्र मनोज आणि सुदीप जोडीने संयमी खेळी साकारत बंगालला संकटातून बाहेर काढले. कामचलाऊ गोलंदाज अभिषेक नायरने सुदीपला बाद करत ही जोडी फोडली. त्याने १८ चौकारांसह १३० धावांची खेळी केली. अग्निव पनलाही अभिषेकने झटपट माघारी धाडले. त्याला ४ धावा करता आल्या. चोरटी धाव घेण्याचा मनोजचा प्रयत्न फसला. त्याने २२ चौकार आणि एका षटकारासह १६९ धावांची खेळी साकारली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ओझा ३० तर अमित कुईला १८ धावांवर खेळत आहेत. मुंबईकडून धवल कुलकर्णीने ४ बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक

  • बंगाल ९९ आणि ८ बाद ४३३ (मनोज तिवारी १६९, सुदीप चॅटर्जी १३०; धवल कुलकर्णी ४/१०८) विरुद्ध मुंबई २२९