ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीच्या पूर्वसंध्येला  पाकिस्तानचा एक चाहता भारताचा सराव पाहण्यासाठी आला होता. पाकिस्तान अंतिम फेरीत नसला तरी त्याला अंतिम फेरी पाहायची होती. भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचाही तो चाहता असल्याने बऱ्याचदा त्याला भेटण्याचा योगही आला. त्यामुळेच धीर करून त्या चाहत्याने धोनीपुढे आपली व्यथा मांडली आणि मोठय़ा मनाने माहीने त्याला अंतिम फेरीचे तिकीटही दिले. मोहम्मद बशिर हा मूळचा पाकिस्तानातला असला तरी सध्या शिकागोमध्ये ‘गरीब नवाझ’ नावाचे बिर्यानीचे हॉटेल चालवतो. क्रिकेटवेडा बशिर विश्वचषकातले पाकिस्तान आणि भारताचे सामने चुकवत नाही. २०१५च्या विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याचे तिकीट त्याने मिळवले आहे, पण ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीचे तिकीट मात्र त्याला मिळू शकले नव्हते.