भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने विश्वविक्रम रचला आहे. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये रविवारी रंगलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. यजमानांनी फलंदाजीस आमंत्रित केल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन या सलामीच्या जोडीने दमदार खेळ करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सलामीवीराची चोख भूमिका बजावत रहाणेने शतकी खेळी केली. तर शिखर धवन आणि विराट कोहलीने अर्धशतकी खेळी करत भारतीय संघाला आव्हानात्मक धावसंख्या रचून दिली. अखेरच्या षटकांत महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधवने आघाडीच्या खेळाडूंनी रचलेल्या पायावर कळस चढवत संघाला ३०० चा टप्पा ओलांडून दिला. या सामन्यात तीनशेचा टप्पा पार करताच भारतीय संघाने एकदिवसीयमध्ये सर्वाधिक वेळा ३०० धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला.

पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना ४३ षटकांचा खेळवण्यात आला. अजिंक्य, शिखर आणि कर्णधार कोहली बाद झाल्यानंतर पांड्याला बढती देण्यात आली. मात्र तो केवळ चार धावा करु शकला. त्यानंतर युवराज सिंगने भारताच्या धावसंख्येत केवळ १४ धावांची भर घातली. ४२ षटकांचा सामना झाला त्यावेळी भारतीय संघाची अवस्था ही ५ बाद २८८ अशी होती. अखेरच्या षटकात भारतीय संघाला ३०० धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी १२ धावांची गरज होती. मैदानात धोनी आणि केदार जाधव यांनी अखेरच्या षटकात फटकेबाजी करत तब्बल २२ धावा ठोकल्या. अखेरच्या षटकातील पाचवा चेंडू  होल्डरने  नो बॉल टाकला. या चेंडूवर खणखणीत चौकार खेचून धोनीने भारताच्या विश्वविक्रमावर शिक्कामोर्तब केला. भारताने  एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक वेळा तीनशेपेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. ऑस्ट्रेलियन संघाचा विक्रम मागे टाकत भारताने हा करिश्मा केला आहे. यापूर्वी सर्वाधिक वेळा ३०० पेक्षा अधिक धावसंख्या उभारण्याचा विक्रम हा ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. ऑस्ट्रेलियन संघाने ९५ वेळा ३०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने ३०० धावा करत ९६ वेळा तीनशे धावा उभारण्याचा विश्वविक्रम रचला.