इंग्लंडविरुद्धचे दोन कसोटी सामने गमावल्यानंतर भारतीय संघावर होणारी टीका संपता संपत नाहीये. त्यातच आता भारतीय संघाला खेळाडूंमधील वादाचे ग्रहण लागले आहे. गौतम गंभीरची मैदानावरील नीतिमूल्ये आणि वर्तणूक यावर कर्णधार महेंद्रसिंग धोनी नाराज असून त्याने गंभीरविरोधात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) तक्रार केल्याचे समजते.
संघाच्या फायद्याऐवजी स्वत:पुरता विचार करणारा गंभीर स्वकेंद्री बनल्याने धोनी नाखूश आहे. गंभीरच्या स्वार्थी आणि संघासाठी घातक अशा वागणुकीची तक्रार धोनीने बीसीसीआयकडे केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. ‘‘स्वत:ची संघातील जागा वाचविण्याकडे गंभीरने लक्ष केंद्रित केले आहे. स्वत:पुरताच विचार करत असल्यामुळे गंभीरच्या खराब फॉर्मचा फटका संघाला बसत आहे. संघासाठी रणनीती आखण्यातही त्याचा सहभाग नसतो,’’ असे भारतीय संघातील एका खेळाडूने सांगितले.
‘‘गंभीर संघासाठी नव्हे तर स्वत:साठी खेळत असल्यामुळे त्याचे धोनीशी खटके उडू लागले आहेत. मुंबई कसोटीच्या दुसऱ्या डावात तळाच्या फलंदाजांना हाताशी धरून आक्रमक फटकेबाजी करण्याऐवजी स्वत:ला नाबाद राखण्यावर गंभीरने भर दिला. त्या वेळी प्रत्येक धाव महत्त्वपूर्ण असताना, संघासाठी योगदान देण्याची गरज असताना, गंभीरने मात्र शांत राहण्याची भूमिका निभावली. कोलकाता कसोटीत रवीचंद्रन अश्विन हा स्पेशालिस्ट फलंदाज नसतानाही त्याने तळाच्या फलंदाजांसह मोलाचे योगदान दिले. जर अश्विन करू शकतो, तर गंभीरने का करू नये?’’ असा सवालही या खेळाडूने विचारला.
कोलकाता कसोटीच्या पहिल्या डावात वीरेंद्र सेहवागला आणि दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजाराला धावबाद केल्याने धोनी आणि गंभीर यांच्या वादात आणखी भर पडल्याचे समजते. तो म्हणाला, ‘‘दोन्ही वेळेला गंभीरचीच चूक होती. सेहवागने टोलावलेल्या चेंडूवर तीन धावा आरामात निघणार, असे असतानाही गंभीरने तिसरी धाव घेण्यासाठी सेहवागला रोखले. पुजाराला धाव घेण्यासाठीचा गंभीरचा कौल चुकीचा होता. स्टीव्हन फिनच्या गोलंदाजीवर तो पूर्णपणे चकित झाला होता, पण पुन्हा स्ट्राइक राखण्यासाठी त्याची धडपड सुरू होती. या प्रयत्नात पुजाराला नाहक आपला बळी द्यावा लागला. नागपूर येथील चौथ्या कसोटी सामन्याआधी बीसीसीआयचे पदाधिकारी गंभीरशी चर्चा करणार असून हे प्रकरण मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहेत. अखेरच्या सामन्यात सर्व खेळाडूंनी आपली सर्वोत्तम कामगिरी करणे महत्त्वाचे आहे.’’
गंभीर आपल्या क्षमतेनुसार कामगिरी करत नसला तरी धोनी पराभवाचे खापर अन्य खेळाडूंच्या माथ्यावर फोडण्याचा प्रयत्न करत आहे, असे गंभीरच्या जवळच्या सूत्राने सांगितले. ‘‘धोनीच्या कर्णधारपदावर जोरदार टीका होत आहे. त्याचे संघातील स्थानही धोक्यात आले आहे. त्याचा अतिबचावात्मक दृष्टिकोन चुकीचा असल्याचे सर्वाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे स्वत:ला वाचवण्यासाठी धोनीने अन्य खेळाडूंना ‘टार्गेट’ करणे सुरू केले आहे. आपले कर्णधारपद गंभीरकडे जाण्याच्या भीतीने, तो कसा चुकीचा आहे, असे दाखवण्याचा घाट धोनीने मांडला आहे,’’ असेही त्याने सांगितले.     

सचिनच्या भवितव्याबाबत उलटसुलट चर्चा नको -धोनी
टीकाकारांना आपल्या बॅटने चोख उत्तर देणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या भवितव्याबाबत उलटसुलट चर्चा करू नये, असे उद्गार भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने काढले. ‘‘सचिनने खेळत राहावे की नाही, यासंदर्भात तर्कवितर्क लढवणे चुकीचे आहे. कारकिर्दीत वेळोवेळी त्याने टीकाकारांना आपल्या खेळानेच प्रत्युत्तर दिले आहे. मी सचिन तेंडुलकर नाही, पत्रकार परिषदेला सचिन स्वत: असेल, तेव्हा त्यालाच तुम्ही निवृत्तीबाबत प्रश्न विचारा. दडपणाच्या परिस्थितीत सचिनची केवळ उपस्थिती महत्त्वाची ठरू शकते. त्याच्याकडे असलेला प्रदीर्घ अनुभव आम्हाला मार्गदर्शक ठरतो,’’ असे धोनीने सांगितले.