महेंद्रसिंग धोनीने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधून भारतीय संघाच्या कर्णधारपदापासून काही काळ विश्रांती घ्यावी आणि त्याच्या जागेवर विराट कोहली या हरहुन्नरी व्यक्तीकडे जबाबदारी सोपवावी, असे मत भारताचा माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे.
‘‘२०१५च्या विश्वचषकाची आपण चिंता करीत असू, तर अजून बरेच दिवस बाकी आहेत. सध्या धोनीला नेतृत्वापासून काही काळ विश्रांती दिल्यास तो अधिक चांगल्या पद्धतीने कामगिरी दाखवू शकेल. एखाद्या मालिकेदरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका संपल्यावर किंवा २०१३च्या उत्तरार्धात हे बदल करून पाहावेत,’’ असे गावस्कर यांनी सांगितले.
‘‘या विसाव्याची धोनीला आवश्यकता आहे. कारण त्यामुळे त्याच्या खेळावर चांगला परिणाम होईल आणि अधिक चांगल्या पद्धतीने तो परतेल. छोटीशी विश्रांती वाईट ठरणार नाही. भारताचे नेतृत्व करणे हा  सन्मान असतो. परंतु आशा-अपेक्षा आणि दडपण यांचे कप्तानावरील ओझे हे प्रचंड मोठे असते,’’ असे गावस्कर यांनी सांगितले.