गेल्या काही महिन्यांपासून स्पॉट-फिक्सिंग प्रकरणावरील मौन अखेर भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सोडले. भारतामध्ये उलटसुलट चर्चा होतच असते, त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य असल्याचे मत धोनीने व्यक्त केले आहे.
आयपीएल स्पॉट-फिक्सिंगबाबतचा अहवाल मुदगल समितीने सर्वोच्च न्यायालयापुढे सादर केला आहे. स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजीमध्ये आयपीएलमधील १३ खेळाडू गुंतले असल्याचा ठपका मुदगल समितीच्या अहवालात ठेवण्यात आला असून या खेळाडूंची नावे अजूनही घोषित करण्यात आलेली नाहीत. धोनी हा चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार असून त्याचा संघाची मालकी असलेल्या इंडिया सिमेंटमध्ये सहभाग असल्याचे सर्वापुढे आले आहे. त्यामुळे सट्टेबाजी आणि स्पॉट-फिक्सिंगमध्ये धोनीचे नाव असल्याची चर्चा सुरू आहे.
‘‘स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यामध्ये माझेही नाव चर्चेत असून याबाबत अधिकृत कोणतीही गोष्ट समोर आलेली नाही. यापुढेही उलटसुलट चर्चा सुरूच राहतील, त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष देणे योग्य वाटत नाही. या अशा गोष्टींना मी आता चांगलाच सरावलो आहे,’’ असे धोनी म्हणाला.
तो पुढे म्हणाला, ‘‘की जर अहवालामध्ये कोणतीही गोष्ट नसेल तरी याबाबत चर्चा सुरूच राहणार. अशा गोष्टी कशा हाताळायच्या हे मला चांगलेच माहिती आहे. काही दिवसांपासून ही चर्चा बंद झाली असली तरी ती पुन्हा सुरू होऊ शकते.’’