मुंबईत झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील खराब कामगिरीमुळे कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर कडाडून टीका होत असली तरी फिरकीपटू हरभजन सिंगने धोनीला पाठिंबा दिला आहे. एका सामन्यातील वाईट कामगिरीमुळे कर्णधाराला दोष देणे चुकीचे ठरेल, असे हरभजनने सांगितले.
‘‘भारताला कसोटीत अव्वल स्थानी पोहोचवण्यात आणि विश्वचषक जिंकून देण्यात धोनीचे योगदान विसरता कामा नये. देशातील सर्वोत्तम कर्णधारांमध्ये धोनीची गणना होते. एका सामन्यातील पराभवामुळे त्याच्या क्षमतेविषयी शंका उपस्थित करू नये. हार किंवा जीत हा खेळाचाच भाग असतो. त्यामुळे खेळाडू किंवा कर्णधार यांना एका सामन्यातील खराब कामगिरीमुळे दोषी धरू नये,’’ असे हरभजनने सांगितले.
भारतीय संघ कोलकाता कसोटीत जोमाने मुसंडी मारेल, असा विश्वास हरभजनला वाटतो. तो म्हणतो, ‘‘इंग्लंडला त्यांच्याच देशात आम्ही अनेक वेळा पराभूत केले आहे, हे लोकांनी विसरता कामा नये. मात्र तेथील जनता अशा प्रकारे खेळाडू आणि कर्णधारावर टीका करत नाही. आम्ही कोलकाता कसोटीत चांगली कामगिरी करून ही मालिका जिंकण्याचा प्रयत्न करू. भारतीय क्रिकेटच नव्हे तर जागतिक क्रिकेटसाठी सचिन तेंडुलकरने दिलेले योगदान मौल्यवान आहे. एका किंवा दोन सामन्यात तो अपयशी ठरला असेल तर त्यावरही टीका करणे अयोग्य आहे. सचिनने यापुढेही देशासाठी खेळत राहावे, हीच माझी इच्छा आहे. त्याच्या उपस्थितीनेच सहकाऱ्यांना स्फुरण चढते. कोलकाता हे सचिनचे आवडते मैदान आहे. तिथे चमकदार खेळी करून सचिन टीकाकारांची तोंडे बंद करेल, अशी आशा आहे.’’