माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांना भारतीय क्रिकेटला दिलेल्या योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार देऊन शुक्रवारी गौरवण्यात आले. बीसीसीआयचे प्रभारी अध्यक्ष शिवलाल यादव यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यता आले. सन्मानचिन्ह, चषक आणि २५ लाख रुपयांचा धनादेश, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मुंबईत झालेल्या एका शानदार कार्यक्रमात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वार्षिक पुरस्कारांचे सन्मानपूर्वक वितरण करण्यात आले. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत २६४ धावांची विश्वविक्रमी खेळी साकारणाऱ्या रोहित शर्माला यावेळी विशेष पुरस्कार देण्यात आला.
‘‘बीसीसीआयने हा मानाचा सन्मान दिला, त्याबद्दल मी आभारी आहे. हा पुरस्कार मिळालेल्या क्रिकेटपटूंची यादी पाहिली की मला स्वत:चा अभिमान वाटतो,’’ असे वेंगसरकर यांनी पुरस्कार स्वीकारल्यावर सांगितले. यावेळी त्यांनी आपली शाळा राजा शिवाजी विद्यालय, पोदार महाविद्यालय, मुंबई विद्यापीठ, दादर युनियन क्लब आणि बीसीसीआयचे माजी संयुक्त सचिव प्रा. चंदगडकर यांचे आभार मानले.
वेंगसरकर म्हणाले, ‘‘मी प्रारंभीच्या दिवसांत मुंबईकडून खेळण्याचे आणि मग भारताकडून खेळण्याचे स्वप्न पाहिले होते आणि ते पूर्ण झाले. भारतीय संघातून खेळताना कसोटी सामना, एकदिवसीय सामना, प्रत्येक दौरा नव्हे, प्रत्येक डावाचा मनमुराद आनंद लुटला.’’ यावेळी वेंगसरकर यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी आणि  आगामी विश्वचषकासाठी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या.
२०१३-१४ या वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पॉली उम्रीगर पुरस्कार भुवनेश्वर कुमारला प्रदान करण्यात आला. चषक आणि पाच लाख रुपयांचा धनादेश देऊन त्याला गौरवण्यात आले. मेरठच्या भुवनेश्वरने ११ कसोटी आणि ४२ एकदिवसीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करताना आणि रणजी क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेश संघाकडून शानदार कामगिरी केली.
जम्मू आणि काश्मीरचा अष्टपैलू क्रिकेटपटू परवेझ रसूल रणजी स्पर्धेतील सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटूच्या पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने नऊ सामन्यांत ६६३ धावा आणि २७ बळी मिळवले आहेत. कर्नाटकला रणजी स्पर्धेचे जेतेपद मिळवून देणारा कर्णधार आर. विनय कुमार हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटू ठरला.
केदार जाधव (१२२३ धावा) आणि रिषी धवन (४९ बळी) यांनी अनुक्रमे रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि बळी मिळवण्याचा पुरस्कार पटकावला. स्मृती मंधना हिला सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार देण्यात आला. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होण्याआधी
शुक्रवारी संध्याकाळी मुंबईत हा सोहळा रंगला.