अनुभवी दिनेश कार्तिकने केलेल्या झुंजार शतकामुळेच तामिळनाडूने बंगालचा ३७ धावांनी पराभव केला आणि विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेचे तिसऱ्यांदा विजेतेपद पटकाविले. तामिळनाडूने यापूर्वी २००८-०९ व २००९-१० मध्ये या स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते व दोन्ही वेळा त्यांनी अंतिम लढतीत बंगाललाच पराभूत केले होते.

बंगालचे आंतरराष्ट्रीय गोलंदाज मोहम्मद शमी व अशोक िदडा यांच्या प्रभावी माऱ्यापुढे तामिळनाडूच्या अन्य फलंदाजांना अपेक्षेइतकी चमक दाखविता आली नाही. कार्तिकच्या शतकी खेळीमुळेच तामिळनाडूला ४७.२ षटकांत २१७ धावांपर्यंत मजल गाठता आली. तामिळनाडूच्या गोलंदाजांनाही सूर गवसला. त्यांनीही अचूक टप्प्यावर मारा करीत बंगालचा डाव ४५.५ षटकांत १८० धावांमध्ये गुंडाळला. बंगालच्या सुदीप चटर्जीने केलेल्या अर्धशतकाचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांना अपेक्षेइतकी अव्वल दर्जाची कामगिरी करता आली नाही.

शमीच्या भेदक माऱ्यापुढे तामिळनाडूची एक वेळ ४ बाद ४९ अशी स्थिती होती, मात्र कार्तिकने अनुभवाच्या जोरावर आत्मविश्वासाने खेळ केला. त्याने बाबा इंद्रजित (३२) याच्या साथीत ८५ धावांची भर घातली व संघाचा डाव सावरला. त्यानंतर तामिळनाडूकडून मोठी भागीदारी झाली नाही, मात्र एका बाजूने शानदार खेळ करीत कार्तिक याने शतकाचा टप्पा ओलांडला. त्याने १२० चेंडूंमध्ये १४ चौकारांसह ११२ धावा केल्या. त्यामुळेच तामिळनाडूला दोनशे धावांपलीकडे पोहोचता आले. बंगालकडून शमीने चार बळी तर िदडाने तीन बळी मिळवले.

श्रीवत्स गोस्वामी (२३) व मनोज तिवारी (३२) यांनी पहिल्या फळीत चमक दाखवूनही अपेक्षेइतका वेग बंगालला ठेवता आला नाही. मधल्या फळीत चटर्जी व अनुपस्तुप मजुमदार यांनी पाचव्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली. त्या वेळी बंगालच्या विजयाच्या आशा कायम होत्या. चटर्जीने पाच चौकारांसह ५८ धावा केल्या. मजुमदारने दमदार २४ धावा केल्या. ही जोडी फुटल्यानंतर बंगालच्या डावाची घसरगुंडी उडाली. तामिळनाडूच्या अश्विन क्रिस्ट, महंमद महंमद व राहिल शहा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत संघाला विजयश्री मिळवून देण्यात हातभार लावला.

 

संक्षिप्त धावफलक

तामिळनाडू : ४७.२ षटकांत सर्व बाद २१७ (दिनेश कार्तिक ११२, बाबा इंद्रजित ३२, व्ही.सुंदर २२, मोहम्मद शमी ४/२६, अशोक िदडा ३/३६) वि.वि. बंगाल: ४५.५ षटकांत सर्व बाद १८० (श्रीवत्स गोस्वामी २४, मनोज तिवारी ३२, सुदीप चटर्जी ५८, अनुपस्तुप मजुमदार २४, अमीर गनी २४, अश्विन क्रिस्ट २/२३, एम.मोहम्मद २/३०, राहिल शहा २/३८).