भारतीय क्रिकेटविश्व ढवळून काढणाऱ्या सामनानिश्चितीच्या मालिकेचा आणखी एक कलंकित प्रकार उघडकीस आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) प्रतिबंधित इंडियन क्रिकेट लीगमध्ये (आयएसएल) सामने निश्चित करणाऱ्या चौकडीत भारतीय क्रिकेटपटू दिनेश मोंगियाचा समावेश असल्याचा धक्कादायक आरोप न्यूझीलंडचा क्रिकेटपटू लू व्हिन्सेंटने केला आहे.

या स्पर्धेत सहभागी झालेला न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ख्रिस केर्न्स याच्या सांगण्यावरून सामने फिक्स करण्याच्या कृत्यात मी सहभागी झालो, अशी कबुली व्हिन्सेंटने दिली आहे. केर्न्स आणि व्हिन्सेंट स्पर्धेतील चंदिगढ लायन्स संघाचा भाग होते. खोटी साक्ष दिल्याप्रकरणी केर्न्सवर लंडन येथील न्यायालयात खटला सुरू आहे. खटल्यादरम्यान साक्षीच्या वेळी व्हिन्सेंटने हा खुलासा केला. सामने फिक्स करण्यामध्ये न्यूझीलंडचाच डॅरेल टफी आणि भारताचा दिनेश मोंगिया यांचा समावेश असल्याची माहिती व्हिन्सेंटने न्यायालयाला दिली. सुमार कामगिरी करण्यासाठी प्रतिसामना ५०,००० डॉलर्स रक्कम मिळेल, असे आश्वासन केर्न्सने दिले होते. सट्टेबाजी प्रकरणात सामील हो, असा आदेशच त्याने दिला होता. केर्न्सच्या सांगण्यावरून २००८ हंगामातील चार सामन्यांमध्ये खराब कामगिरी केली. मात्र अशी कामगिरी केल्याचे पैसे अद्यापही मिळालेले नाहीत. मात्र केर्न्सला जाब विचारणे शक्य नाही. सामनानिश्चिती प्रकरणात घोळ घातल्याने केर्न्सने मारण्याची धमकीही दिली होती, असे व्हिन्सेंटने सांगितले.

चंदिगढ लायन्स संघाकडून खेळणे सोडल्यानंतरही सामने फिक्स करत राहिलो, असा धक्कादायक गौप्यस्फोटही व्हिन्सेंटने केला. २०१२ मध्ये व्हिन्सेंटने गुन्ह्य़ाची कबुली दिली होती. दरम्यान केर्न्सने व्हिन्सेंटच्या वक्तव्याचा इन्कार केला आहे.
‘‘त्या वेळी मला नैराश्याने ग्रासले होते. माझी मानसिक स्थिती ठीक नव्हती. त्या वेळी या चौकडीचा भाग होणे मला योग्य वाटले,’’ असे व्हिन्सेंटने सांगितले. दरम्यान मोंगियाने या आरोपाचे खंडन केले आहे. ‘‘मी कधीही कोणत्याही सामन्यात सामनानिश्चिती किंवा सट्टेबाजीत सहभागी झालेलो नाही. केवळ आपल्याला बदनाम करण्यासाठी हे आरोप केले जात आहेत. मी जरी चंदिगढ लायन्सकडून खेळत होतो तरी केर्न्स, टफी व व्हिन्सेंट हे काय करीत होते याची मला माहिती नव्हती,’’ असे मोंगियाने सांगितले.
आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी २००८ मध्ये दिनेश मोंगियाची आयसीएल स्पर्धेमधून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र त्याच्या हकालपट्टीचे कोणतेही कारण देण्यात आले नव्हते.

बीसीसीआयने प्रतिबंधित केल्यामुळे थोडय़ाच कालावधीत इंडियन क्रिकेट लीग स्पर्धा बंद पडली. मात्र खेळाडूंचे हित लक्षात घेऊन बीसीसीआयने खेळाडूंना माफ करत मुख्य प्रवाहात येण्याची संधी दिली. मात्र गंभीर आरोपांमुळे मूळ स्पर्धेतूनच डच्चू मिळालेला असल्याने मोंगियाचे मुख्य प्रवाहात येण्याचे दरवाजे बंद झाले.