राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेच्या सुवर्णपदकासाठी हँडस्प्रिंग ५४०साकारणार

रिओ ऑलिम्पिकमध्ये ‘प्रोडय़ुनोव्हा’ साकारून भारताची जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्माकरने सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र उजव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे तिने ‘प्रोडय़ुनोव्हा’ प्रकार करणे तात्पुरते थांबवले आहे. २०१८ मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत सुवर्णपदक जिंकण्याच्या निर्धाराने ती व्हॉल्टमधील ‘हँडस्प्रिंग ५४०’ प्रकार साकारणार आहे.

‘‘ऑस्ट्रेलियात होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत मी ‘हँडस्प्रिंग ५४०’ प्रकारात नशीब अजमावणार आहे. हवेत कसब दाखवण्याचा हा प्रकार आहे. हा प्रकारही अवघड आहे. मात्र ‘प्रोडय़ुनोव्हा’च्या तुलनेत सोपा आहे,’’ असे दीपाने एका मुलाखतीत गुरुवारी सांगितले. दीपाच्या उजव्या गुडघ्यावर एप्रिलमध्ये शस्त्रक्रिया झाली. या शस्त्रक्रियेमुळे तिला अशियाई अजिंक्यपद जिम्नॅस्टिक स्पर्धेत सहभागी होता आले नाही.

‘प्रोडय़ुनोव्हा’ प्रकार सोडल्याबाबत दीपा म्हणाली, ‘‘मला अँटेरियर क्रुशियल लिगामेंट (एसीएल) दुखापतीने ग्रासले आहे. या दुखापतीमुळे मी ‘प्रोडय़ुनोव्हा’ प्रकार करू शकत नाही. त्यातच दुखापत बळावून मला दडपण वाढवायचे नाही. माझे लक्ष्य २०२०च्या ऑलिम्पिक स्पध्रेचे आहे. त्या ऑलिम्पिकमध्ये ‘हँडस्प्रिंग ५४०’ प्रकारात सवरेत्कृष्ट कामगिरी करून पदक मिळवायचे आहे. मात्र ‘प्रोडय़ुनोव्हा’ प्रकार करीत राहीन,’’ असे दीपा म्हणाली.

२०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये पदकाने हुलकावणी दिली तरी दीपाची कामगिरी सर्वाच्या लक्षात राहिली. व्हॉल्ट प्रकारातील सर्वात अवघड अशा ‘प्रोडय़ुनोव्हा’ प्रकारात (व्हॉल्ट ऑफ डेथ) तिने अप्रतिम कामगिरी साकारली. ऑलिम्पिकनंतर त्रिपुराच्या दीपाची ओळख ‘प्रोडय़ुनोव्हा गर्ल’ अशी झाली. जगभरातील केवळ पाच जिम्नॅस्टिकपटूंना ‘प्रोडय़ुनोव्हा’ प्रकार यशस्वीपणे करता आला आहे. रशियाची आघाडीची जिम्नॅस्टिकपटू येलेना प्रोडय़ुनोव्हाच्या नावावरून या क्रीडा प्रकाराला ‘प्रोडय़ुनोव्हा’ नाव पडले आहे.  दुखापतीमुळे अनेक महिने आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भाग न घेतल्याने एप्रिल महिन्यात गोल्ड कोस्टमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत दीपाच्या पदक मिळवण्याच्या आशा अंधूक झाल्या आहेत, असे बोलले जाते. मात्र सवरेत्कृष्ट कामगिरीचा विश्वास असल्याचे तिने म्हटले आहे.

‘‘काही स्पर्धामध्ये न खेळल्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेतील कामगिरीवर फरक पडेल, असे मला वाटत नाही. स्पर्धेतील सहभागापेक्षा तुमच्या सरावावर खूप काही अवलंबून असते. त्यामुळे स्पर्धामध्ये खेळायला हवे, असे नाही. दुखापतीकडे वेळीच लक्ष द्यावे लागते. तसेच त्यातून बाहेर पडण्यासाठी तितकाच वेळही द्यावा लागतो. रिओ ऑलिम्पिकनंतर माझी दुखापत बळावली. मात्र दुखापत हा खेळाचा एक भाग आहे. मी दुखापतीतून वेगाने सावरत आहे,’’ असे दीपाने सांगितले.