लंडन येथ सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या करमज्याोति दलालने कास्य पदकाची कमाई केली. थाळीफेक प्रकारात करमज्योतीने १९.०२ मीटर लांब थाळी फेकत ही कामगिरी केली. बहरीनच्या अलोमरी रोबा हिला मागे टाकत अखेरच्या क्षणाला तिने बाजी मारली. अलोमरीने १९.०१ मीटर थाळी फेकली होती. त्यानंतर करमज्योतीने किंचितशा फरकाने अधिक लांब थाळी फेकली. मागीलवर्षी झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत करमज्योती समाधानकारक कामगिरी करण्यात अपयशी ठरली होती. त्यानंतर मार्चमध्ये दुबईत रंगलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण कमाई केली होती. लंडन पॅरा अॅथलेटीक्स स्पर्धेत भारताच्या सुंदरसिंह गुर्जरने सुवर्णपदकाने खाते उघडले. भालाफेक प्रकारात सुंदरने ६०.३६ मीटर लांब भाला फेकत सुवर्ण पदकाची कमाई केली.

या स्पर्धेत मिळवलेलं सुवर्णपदक हे सुंदरसाठी अत्यंत महत्वाचं ठरलं. कारण रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत सुंदरला भारताच्या संघात प्रवेश नाकारला होता. त्यामुळे या स्पर्धेत चांगली कामगिरी करत आपल्या टीकाकारांना उत्तर देणं सुंदरसाठी अत्यंत गरजेचं बनलं होतं. त्यानुसार सुरेंद्रने लंडनमध्ये ही अभिमानास्पद कामगिरी केली. त्यानंतर दोन दिवासाने अमित सरोहाने क्लब थ्रो प्रकारात रौप्य पदक मिळवले. या दोघांच्या कामगिरीनंतर करमज्योतिने  कास्य पदकाची कमाई केली. या स्पर्धेत भारताने सुवर्ण, रौप्य आणि कास्य पदकाची कमाई करत तीन पदके जिंकली आहेत.