आजच्या ‘क्वालिफायर-२’ सामन्याविषयी क्रिकेटरसिकांना उत्कंठा
रविवारी आयपीएलच्या अंतिम फेरीत गुजरातची सिंहगर्जना होणार की हैदराबादचा सूर्योदय होणार, या प्रश्नाचे उत्तर क्रिकेटरसिकांना शुक्रवारी रात्री मिळणार आहे. आयपीएलच्या क्षितिजावर प्रथमच तळपणारा गुजरात लायन्सचा संघ विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल करीत आहे, तर त्यांची घोडदौड रोखण्याचा निर्धार दिमाखात वावरणाऱ्या सनरायझर्सने केला आहे. त्यामुळेच ‘क्वालिफायर-२’ सामना रोमहर्षक होण्याची चिन्हे आहेत.
सुरेश रैनाच्या नेतृत्वाखालील गुजरातने पहिल्यावहिल्या हंगामातच सर्वाचे लक्ष वेधून घेताना आयपीएल गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले होते आणि बाद फेरी गाठली होती. गुजरातचा संघ ‘क्वालिफायर-१’चा अडथळा सहज ओलांडून अंतिम फेरीत पोहोचणार होता. मात्र एबी डी’व्हिलियर्स त्यांच्या विजयाच्या वाटेवर पहाडासारखा उभा राहिला. त्याने विजयाचा घास अक्षरश: हिसकावून घेतला. मात्र आतासुद्धा गुजरातचा मार्ग सोपा नाही. कारण साखळीतील दोन्ही लढतींमध्ये हैदराबादने गुजरातला अस्मान दाखवले आहे. दोन्ही सामन्यांत हैदराबादने गुजरातच्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला होता.
अनुभवी डावखुरा वेगवान गोलंदाज आशीष नेहराच्या अनुपस्थितीत हैदराबादची गोलंदाजी कमकुवत होईल, अशी अपेक्षा होती. मात्र भुवनेश्वर कुमार आणि बांगलादेशच्या मुस्तफिझूर रेहमानने संघाच्या वेगवान माऱ्याची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. ‘एलिमिनेटर’च्या सामन्यात कर्णधार डेव्हिड वॉर्नरने भुवी आणि मुस्तफिझूर यांचा खुबीने वापर केला आणि कोलकाता नाइट रायडर्सला नामोहरम केले.
फिरोझशाह कोटलाची खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल ठरते. पण जसजसा सामना पुढे जातो, तसतशी ती धीमी होत जाते. गुजरातचा वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात ज्या पद्धतीने त्यांची आघाडीची फळी तंबूत धाडली, ते पाहता हैदराबादच्या फलंदाजांचीही अग्निपरीक्षा ठरणार आहे. अशा परिस्थितीत कसे खेळावे, हे युवराजने कोलकाताविरुद्ध दाखवून दिले. त्याच्या महत्त्वपूर्ण खेळीमुळेच सामन्याचा निकाल पालटला. युवराज त्याच्या पूर्वीच्या फॉर्मात परतला आहे, ही हैदराबादच्या दृष्टीने सुखद गोष्ट आहे.
हैदराबादच्या वेगवान माऱ्याचा आत्मविश्वासाने सामना करण्यासाठी गुजरातकडे दिग्गज फलंदाजांची फळी आहे. या महत्त्वाच्या सामन्यात ब्रेंडन मॅक्क्युलमची फलंदाजी बहरेल, अशी अपेक्षा आहे. याशिवाय सामन्याचे चित्र बदलू शकणारे ड्वेन स्मिथ, आरोन फिंच यांच्यासारखा फलंदाजसुद्धा त्यांच्याकडे आहेत.
हैदराबाद-गुजरात सामन्यात जो संघ जिंकेल तो प्रथमच आयपीएलची अंतिम फेरी गाठणार आहे. याशिवाय आता उरलेल्या तिन्ही संघांनी अद्याप आयपीएल विजेतेपद जिंकले
नसल्याने यंदा नवा विजेता उदयास येणार आहे.

संघ
सनरायझर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), शिखर धवन, युवराज सिंग, मोझेस हेनरिक्स, ईऑन मॉर्गन, दीपक हुडा, नमन ओझा, कर्ण शर्मा, मुस्तफिझूर रेहमान, भुवनेश्वर कुमार, बरिंदर सरण, ट्रेंट बोल्ट, बेन कटिंग, केन विल्यमसन, आशीष रेड्डी, रिकी भुई, बिपुल शर्मा, सिद्धार्थ कौल, अभिमन्यू मिथुन, विजय शंकर, टी. सुमन, आदित्य तरे.

गुजरात लायन्स : सुरेश रैना (कर्णधार), ड्वेन स्मिथ, ब्रेंडन मॅक्क्युलम, आरोन फिंच, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, डेल स्टेन, जेम्स फॉकनर, इशन किशन, प्रवीण कुमार, धवल कुलकर्णी, शिविल कौशिक, ड्वेन ब्राव्हो, सरबजित लड्डा, अमित मिश्रा, आकाशदीप नाथ, पारस डोग्रा, एकलव्य द्विवेदी, शदाब जकाती, प्रदीप सांगवान, जयदेव शाह, उमंग शर्मा, प्रवीण तांबे, अ‍ॅन्ड्रय़ू टाय.

सामन्याची वेळ : रात्री ८ वाजल्यापासून.
थेट प्रक्षेपण : सोनी मॅक्स, सोनी सिक्स.